सोलापूर : महामंडळाच्या चालक व वाहक भरतीत बनावट वैद्यकीय दाखले देवून नोकरीला लागलेल्या तिघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
राज्याच्या एसटी महामंडळाने चालक व वाहक पदांसाठी दोन वर्षांपूर्वी भरती काढली होती. त्यावेळी अशोक मधुकर साळुंखे, चंद्रकांत शिवाजी रणदिवे या दोघांनी चालक पदांसाठी अर्ज केले होते. त्यासाठी त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातून बनावट सही-शिक्का असलेले बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. ते प्रमाणपत्र खरे असल्याचे भासवून राज्य परिवहन महामंडळाला सादर केले. याशिवाय संगीता सूर्यभान घाडगे यांनीही तसेच प्रमाणपत्र देवून महामंडळाची फसवणूक केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
विभाग नियंत्रक गोंजारी यांच्या फिर्यादीवरून अकलूज आगारातील अमोल साळुंखे, चंद्रकांत रणदिवे यांच्यासह वाहक संगीता घाडगे या तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्या तिघांनी २२ मार्च २०२२ ते ६ एप्रिल २०२४ या काळात त्यांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून महामंडळाची व शासनाची फसवणूक केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलिस निरीक्षक अजित पाटील तपास करीत आहेत.
एसटी महामंडळाच्या बसमधून दिव्यांग प्रवाशांना तिकीट दरात सवलत आहे. याचा गैरफायदा घेवून अनेकांनी कर्णबधिर, पायात अपंग अशी कारणे दाखवून सवलतीचे पास घेतल्याचेही सांगितले जात आहे. त्याचीही भविष्यात पडताळणी होवू शकते.