पुणे : ज्येष्ठ महिला पीएमपीत चढत असताना अचानक दरवाजा लागला आणि प्रवासी महिला खाली पडल्या. बसचे चाक पायावरून गेल्याने महिला जखमी झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना १२ एप्रिल रोजी दांडेकर पुलाजवळील पीएमपी स्थानकावर घडली.
काशीबाई पांडुरंग खुरंगळे (वय ६०, रा. धायरी) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मल्हारी पांडुरंग खुरंगळे (३१) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बसचालक दिलीपराव वामनराव लहाने (५०, रा. टकलेनगर, मांजरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी मल्हारी खुरंगळे हे आई-वडील, मुलासह धायरी परिसरात राहायला आहेत. मृत काशीबाई खुरंगळे या राजेंद्रनगरमध्ये राहणा-या मुलीकडे आल्या होत्या. फिर्यादी मल्हारी खुरंगळे हे आई-वडिलांना परत घरी घेऊन जाण्यासाठी आले आणि दांडेकर पूल येथील पेट्रोलपंपाजवळील पीएमपी स्थानकावर धायरीकडे जाणा-या बसची वाट पाहत होते.
थोड्या वेळात धायरी डीएसके विश्व जाणारी पीएमपी आली. काशीबाई यांचे वय अधिक असल्याने त्यांना बसमध्ये चढता येत नव्हते. फिर्यादी मल्हारी खुरंगळे हे बहिणीच्या मदतीने आईला बसच्या पाठीमागील दरवाजातून चढवत होते. अचानक बसचा दरवाजा बंद झाला आणि बस पुढे निघाली. यामुळे काशीबाई खाली पडल्या आणि त्यांच्या डाव्या पायावरून बसचे चाक गेले. पायाचा चेंदामेंदा झाला. उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली.
यानंतर उपचारासाठी काशीबाईंना ससून रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान काशीबाई यांचे १४ एप्रिल रोजी निधन झाले. पीएमपीचालकाने हयगयीने, बेदरकारपणे बस चालविल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. अधिक तपास पर्वती पोलिस करत आहेत.