मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता महायुती सरकारने लाडक्या बहिणींना मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. या सरकारी योजनेचे फायदे उकळण्यासाठी निकषांच्या बाहेर जाऊन अर्ज भरलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता काही महिलांना यापुढे पैसे मिळणं बंद होणार आहे. त्यावर बोलताना उबाठा पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या योजनेत फार मोठा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे.
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांना पत्रकारांनी लाडकी बहीण योजनेबाबत विचारले. त्यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ही योजना म्हणजे लाडक्या बहिणी आणि सरकारमधला विषय आहे. आम्ही लाडक्या बहिणींमुळे जिंकलो असे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे जर आता त्या बहिणींना पैसे देणार नसाल तर त्यांचे मतही परत द्या. हा फार गंभीर विषय आहे. यात फार मोठा घोटाळा झाला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.