नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बांगलादेशची मोठी लोकसंख्या कपडा इंडस्ट्रीवर अवलंबून आहे. बांगलादेशमध्ये निर्माण झालेले कपडे भारतातच नाही तर जगभरात मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जातात. भारत सीमेवर कुंपण उभारत असताना बांगलादेशने त्यास खोडा घालण्याचा कुटील प्रयत्न केला. मोदी सरकारने पाकिस्तान आणि चीनला जसा धडा शिकविला तशी वेळ पुन्हा येऊन ठेपली आहे. भारत गाजावाजा न करता एका झटक्यात बांगलादेशला मोठा धडा शिकवू शकणार आहे.
भारताने पाकिस्तानशी व्यापारी संबंध तोडले होते. तसेच कोरोना, अमेरिका-चीनच्या व्यापारी वादावर भारताने संधी साधत अॅपल सारख्या कंपन्या, सेमीकंडक्टर उद्योग आणत चीनलाही धडा शिकविला आहे. अशातच बांगलादेशनेही भारताशी पंगा घेतल्याने बांगलादेशच्या टेक्सटाईल इंडस्ट्रीचे महत्व कमी करण्याची तयारी सुरु केली आहे.
पुढील महिन्यात देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामध्ये मोदी सरकार गारमेंट इंडस्ट्रीला मोठे पॅकेज देऊ शकते. यामध्ये अर्थसहाय्य, कच्च्या मालावरील कर कपात, स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाऊ शकते. अशाने बांगलादेशाच्या ताटात थोडेबहुत जे काही पडत होते ते देखील भारताशी पंगा घेतल्याने निघून जाण्याची वेळ आली आहे.
राजकीय अस्थिरतेमुळे बांगलादेशच्या कपड्यांच्या निर्यातीत घट झाली आहे. अमेरिकेला होणारी वस्त्र निर्यात ०.४६% घसरून ६.७ अब्ज डॉलर्सवर आली. तर भारताची निर्यात ४.२५% वाढून ४.४ अब्ज डॉलर्स झाली आहे. हळूहळू भारत यातही मोठी मुसंडी मारण्याची शक्यता आहे.