ढाक्का : वृत्तसंस्था
बांगलादेशच्या सैन्यात महिला सैनिकांना हिजाब परिधान करण्याची परवानगी देण्यात आली आहे. खरे तर, २००० साली बांगलादेशच्या सैन्यात महिलांचा समावेश करण्यात आला होता. तेव्हापासूनच सैन्यात हिजाबवर बंदी होती. मात्र आता कट्टरतावाद्यांच्या दबावामुळे बांगलादेश आर्मीने आपल्या नियमांत बदल केले आहेत.
महिला सैनिकांची हिजाब घालण्याची इच्छा असेल तर त्या घालू शकणार आहेत. यासंदर्भात अॅडज्युटंट जनरल कार्यालयाने आदेशही जारी केला आहे. यानंतर आता महिला लष्करी कर्मचा-यांसाठी हिजाब घालणे ऐच्छिक करण्यात आले आहे.
बांगलादेशच्या लष्करात महिला सैनिकांना आतापर्यंत गणवेशासह हिजाब घालण्याची परवानगी नव्हती. अॅडज्युटंट कार्यालयाने आता वेगवेगळ्या गणवेशांसोबतच (कॉम्बॅट युनिफॉर्म, वर्किंग युनिफॉर्म आणि साडी) हिजाबचे नमुने देण्याचे निर्देश दिले आहेत. हिजाबच्या नमुन्यात फॅब्रिक, रंग आणि आकाराचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच, प्रस्तावित हिजाब परिधान केलेले महिला लष्करी जवानांचे रंगीत फोटो संबंधित विभागाला पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.