लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. संभाव्य पाणी टंचाईचे संकट लक्षात घेवून नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा. अवैध पद्धतीने पाणी उपसा करणा-यांवर कार्यवाही करण्यासाठी संयक्त्त पथके स्थापन करण्यात आली असून याविषयीची मोहीम अधिक कडक स्वरुपात राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालामध्ये पाणी टंचाईच्या अनुषंगाने करण्यात येणा-या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, कार्यकारी अभियंता अमर पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम यावेळी उपस्थित होते. विविध प्रकल्पांमध्ये पिण्यासाठी आरक्षित केलेला जलसाठा इतर कारणांसाठी वापरला जाणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. लघुपाटबंधारे विभाग, महावितरण, महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने दक्ष राहून अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी दिल्या. तसेच शहरामध्ये बांधकामासाठी पाणी वापरावर निर्बंध आणण्याच्या सूचना त्यांनी लातूर शहर महानगरपालिका आयुक्तांंना दिल्या.