पुणे : प्रतिनिधी
एक व्यक्ती म्हणजे पक्ष नाही आणि बाहेरच्या पक्षातून आमच्या पक्षात आलेल्या व्यक्तींना पक्षाची वैचारिक भूमिका माहीत नाही, पक्षाची ध्येयधोरणे माहीत नाहीत. त्यामुळे सातत्याने एकच व्यक्ती टीका करत असेल तर समजून जावे की मानसिकता काय आहे, मला ते फार महत्त्वाचे वाटत नाही, असे प्रत्युत्तर रुपाली चाकणकर यांनी रुपाली पाटील ठोंबरे यांना दिले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतर आता चाकणकर यांना पक्षातूनच विरोध सुरू झाला आहे. त्यांच्या निवडीने पक्षातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘एक व्यक्ती-एक पद’ नियमानुसार रुपाली चाकणकर यांच्याकडील महिला प्रदेशाध्यक्षपद काढून घ्या, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे. यावरून आता रुपाली चाकणकर यांनी ठोंबरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यभर काम करत असताना राज्यात संघटना उभी केली. आयोगाचे काम करत असताना आयोगातील काम केले आहे, त्यामुळे अशा व्यक्तींवर बोलणे मला फार उचित वाटत नाही. माझा आनंदाचा क्षण आहे, पक्षाने दिलेली जबाबदारी मी पेलली, हा विश्वास पक्षाला वाटला म्हणून पक्षाने मला दिली, याबद्दल पक्षाचे आभार, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.
काही दिवसांपूर्वीही रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले होते. तर आता चाकणकर यांना पुन्हा एकदा आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. काल पुणे शहरचे अध्यक्ष दीपक मानकर यांनीही नाराजी व्यक्त केली. काल त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, यावेळी त्यांनी पक्षाला राजीनामा देणार असल्याचे जाहीर करत उघड-उघड नाराजी व्यक्त केली.
दीपक मानकरांनी नाराजी व्यक्त केली
एवढी तत्परता आमचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आहे की, रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष पहिले पद त्यांचे जाहीर केले. त्यांच्यानंतर विधान परिषदेची यादी जाहीर केली. मग तुम्ही तेवढी तत्परता आमच्यासाठी का दाखवली नाही? असा सवालही मानकर यांनी केला.