रेणापूर : प्रतिनिधी
एका रात्रीत अज्ञात चोरट्यांनी सहा घरांमध्ये प्रवेश करून नगदी एक लाख ३८ हजार रोख रकमेसह दोन तोळे सात ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी रात्री बीटरगाव येथे घडल्याची घटना ताजी असताना दुस-याच दिवशी म्हणजे रविवारी दि. १० डिसेंबर रोजी बिटरगाव येथेच अज्ञात चोरट्यांनी तीन घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत त्यापैकी एका घरातील लोखंडी पेटीत ठेवण्यात आलेल्या ५ ग्रॅम सोन्याची अंगठी व दोन हजार रुपये रोख असा ऐवज चोरट्यांने लपास केला तर दोन घरात त्यांच्या हाताला काहीच लागले नाही. गावात दुस-यादा घडलेल्या घटनेमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे तर चोरट्याने पोलिसा समोर आवाहन निर्माण केले आहे .
तालुक्यातील बिटरगाव येथे शुक्रवार दि . ८ डिसेंबर च्या मध्यरात्री मनोहर दणदणे यांच्या घराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाट तोडून त्यातील ९ ग्रॅम सोन्याचे गंठण व ८ ग्रॅम वजनाची कर्नफुले असा एकूण एक तोळा ७ ग्रॅम वजनाचा ऐवज व ७० हजार रुपये रोख लंपास केला होता. तसेच ज्ञानेश्वर जगताप यांच्याही घराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून लोखंडी पेटीत ठेवलेले एक तोळा सोन्याचे दागिने व ६८ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ३८ हजार रोख रकमेसह दोन तोळे ७ ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनीे लंपास केले होता. याच रात्री गावातील मेघराज जाधव, अन्सारी शेख, इस्माईल शेख, ताहेर शेख यांच्याही घरामध्ये कुलपे तोडून प्रवेश केला मात्र तेथे चोरट्यांंच्या हाताला कांहीच लागले नाही.
दरम्यान ही चोरीची घटना ताजी असतानाच बिटरगाव येथे पुन्हा रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांने संदिपान ग्यानदेव जाधव यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून लोखंडी पेटीतील ५ ग्रॅम सोन्याची अंगठी व दोन हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला तर गावातील संजय महादेवराव देशमुख, चंद्रकांत शंकर वाकडे यांच्याही घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांने घरात प्रवेश केला मात्र त्यांच्या हाताला काही लागले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे, बीट जमादार बालाजी डप्पडवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या घटनांचे पंचनामा केला.