लातूर : प्रतिनिधी
चालू खरीप हंगामात बियाणे, खते विक्रीसाठी बाजारात अनेक कंपन्या उतरल्या होत्या. या कंपन्यांचे खत, बियाणे, किटकनाशके यांचे लातूर जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातील निरीक्षकांनी एप्रिल ते जुलै अखेर दरम्यान नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यात बियाणांचे २२ तर खतांचे ९ नमुने अप्रमाणीत आले आहेत. यातील कांही कंपन्यावर कोर्ट केस दाखल करण्यात आल्या आहेत.
खरीप हंगामात विविध कंपन्यांचे बियाणे, खते व किटकनाशके विक्रीसाठी दरवर्षी दाखल होतात. लातूर जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातील निरीक्षकांनी एप्रिल ते जुलै अखेर पर्यत बियाणांचे ३११ नमुणे काढून ते परभणी येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला आसून यात २२ नमुने अप्रमाणीत आसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या मानकानुसार उगवणक्षमता कमी असलेल्या ५ बियाणांच्या कंपन्यावर कोर्ट केस दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. तर १७ नमुने अप्रमाणीत असलेल्या कंपन्यांना बियाणांच्या दर्जा सुधारण्याची ताकीद देण्यात आली आहे.
तसेच याच कालावधीत खतांचे ९८ नमुने काढून निरीक्षकांनी छत्रपती संभाजी नगर येथील प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यापैकी ९ खतांच्या कंपन्यांचे नमुने हे शासनाने ठरवून दिलेल्या अन्न द्रव्याच्या तुलनेत कमी असने, खताचा आकारमान कमी असणे आदी कारणामुळे ते अप्रमाणीत झाले आहेत. त्यामुळे यापैकी ६ खताच्या कंपन्यांच्यावर कोर्ट केस करण्याची प्रक्रीया सुरू आहे. तर ३ कंपन्यांना खतांची मात्रा सुधारण्यासाठी सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच किटकनाशकांचे ३७ नमुने काढून अमरावती येथील प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. त्याचा अहवाल येणे बाकी आहे.