१० दिवसांची सीबीआय कोठडी
पाटणा : बिहारमधील नीट-यूजी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुख्य आरोपी राकेश रंजन (रॉकी) याला आज अटक केली. राजधानी पाटण्यातून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. यासंबंधीची माहिती सीबीआय अधिका-यांनी दिली.
राकेश रंजनला अटक केल्यानंतर त्याला पाटणा येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला १० दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. रॉकीशी संबंधित पाटणा आणि कोलकात्यामधील काही ठिकाणांवरही छापे घालण्यात आले असता तपास संस्थेच्या हाती आक्षेपार्ह साहित्य लागले. रांचीमध्ये रॉकीच्या मालकीचे एक हॉटेल आहे. नीटचा पेपर फुटल्यानंतर त्यानेच उत्तरपत्रिकेचा जुगाड केला होता, अशी माहिती समोर आली आहे. धनबादमधून अमनसिंह याला अटक केल्यानंतर रॉकी तपास यंत्रणेच्या हाती लागला.
नीट-यूजी पेपर लीकमध्ये रॉकीची प्रमुख भूमिका राहिलेली आहे. त्याबाबत ठोस माहिती मिळाल्यानंतर रॉकीच्या अटकेसाठी सीबीआयने फास आवळला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार संजीव आणि रॉकी विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांची सेटिंग लावत होते. एवढेच नव्हे तर रॉकीने नीट पेपरचे पीडीएफ चिंटूच्या मोबाईलवर पाठविले होते. हा प्रकार समोर येताच पोलिस रॉकीच्या शोधात होते आणि रॉकीपर्यंत पोहोचण्यासाठी सीबीआयच्या पथकाने रॉकीचा निकटवर्तीय मुकेश, चिंटू, मनीष, प्रकाश आणि आशुतोष यांना रिमांडवर घेऊन सातत्याने चौकशी सुरू होती. या चौकशीतून मिळालेल्या माहितीआधारे सीबीआयने १७ दिवसांत बिहार-झारखंडमधील १७ ठिकाणी झाडाझडती घेतली. त्यामुळे रॉकीला पकडण्यात यश आले.