17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमुख्य बातम्याबिहार सरकारची जातनिहाय जनगणना खोटी : राहुल गांधी

बिहार सरकारची जातनिहाय जनगणना खोटी : राहुल गांधी

पाटणा : वृत्तसंस्था
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज बिहार दौ-यावर आहेत. त्यांनी पाटण्यात आयोजित कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी बिहार सरकारने केलेली जात जनगणना खोटी असल्याची टीका केली. आपल्या बिहार दौ-यात राहुल गांधी काँग्रेस नेत्यांसोबत बैठका घेणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा हा दौरा काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

खासदार राहुल गांधींनी शनिवारी बिहारची राजधानी पाटणा येथे संविधानाचे संरक्षण, या विषयावर आयोजित परिषदेत भाग घेतला. यावेळी राहुल गांधींनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. संविधान सुरक्षा परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, बिहारमध्ये खोटी जात जनगणना करण्यात आली. देशात जात जनगणना योग्य पद्धतीने करावी लागेल. जात जनगणनेशिवाय देशातील सर्वांचा विकास होऊ शकत नाही.

देशातील जातींची खरी परिस्थिती शोधणे आवश्यक आहे. मी संसदेत पंतप्रधान मोदींना सांगितले की, आम्ही तुमच्यासमोर जात जनगणना लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करून घेऊ. जात जनगणना ही देशासाठी एक्सरे आणि एमआरआयसारखी आहे. कोणत्या वर्गात किती लोक आहेत, यातून कळेल, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरचा त्यांचा हा पहिलाच बिहार दौरा आहे. या वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे राहुल गांधींचा हा दौरा खास आहे. राहुल गांधींच्या या दौ-याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बिहारमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकीची रणनीती बनवण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR