चाकूर : प्रतिनिधी
येथील सीमा सुरक्षा दलाच्या सहायक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेले बीएसएफचे ३५८ जवान देश सेवेसाठी सज्ज झाले असून प्रशिक्षण घेतलेल्या जवानांचा दीक्षांत समारंभ महानिरीक्षक विनीत कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज परेड ग्राऊंडवर झाला.
येथील सीमा सुरक्षा दलाच्या सहायक प्रशिक्षण केंद्रात ३५८ प्रशिक्षणार्थीचे २७ नोव्हेंबर २०२३ ते ११ आक्टोबर २०२४ पर्यंत ११ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी त्यांना दीक्षांत समारंभात देशसेवेची शपथ देण्यात आली. यावेळी सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक विनीत कुमार यांना जवानांनी मानवंदना दिली. यावेळी समादेष्टा मदनपाल सिंह उपस्थित होते. दीक्षांत समारंभा देशातील विविध राज्यातून प्रशक्षिणासाठी जवान सहभागी झाले होते. यामध्ये सर्वश्रेष्ठ कामगीरी करणा-या व प्रशिक्षणार्थी जवानांमध्ये पंकज सैनी आणि नागेन्द्र कुमार यांनी सुवर्णपदक पटकाविले. त्यांना सन्मानीत करण्यात आले.
शपथग्रहण सोहळ्याच्या परेडचे नेतृत्व प्रशिक्षणार्थी महेंद्र सिंह यांनी केले. यावेळी महानिरीक्षक विनीत कुमार यांनी या खडतर प्रशिक्षणानंतर हे जवान देशाच्या विविध सीमेवर कठीण परिस्थितीतही देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. यावेळी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अधिकारी, जवानांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जवानांनी विविध कवायतीचे चांगल्या प्रकारे सादरीकरणही केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी सचिन राठोड, एसबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक अजय घटानी, वनरक्षक मीरा बोमलेसह बीएसएफचे अधिकारी, कर्मचारी, जवान उपस्थित होते.