बीड : प्रतिनिधी
बीडमध्ये २०१९ साली झालेल्या शिक्षक साजेद अली खून प्रकरणी १४ आरोपींपैकी गुजर खान उर्फ अन्वर खान मिर्झा खान याच्यासह १२ आरोपींना आजन्म कारावास म्हणजेच जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. उर्वरित दोघांपैकी एकाला पाच वर्षाचा कारावास व पाच लाख रूपये दंडाची तर दुस-याला सहा महिन्यांचा कारावास व पाचशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षेच्या सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. विशेष मोका न्यायालयाने प्रथमच एवढ्या आरोपींना एकाचवेळी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यामुळे, बीडमधील हा निकाल ऐतिहासिक मानला जात आहे.
बीड शहरातील बालेपीर भागात १९ सप्टेंबर २०१९ रोजी सैनिकी विद्यालयातील शिक्षक सय्यद साजेद अली (वय ३७) यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या प्रकरणात एकूण १८ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात बीडच्या विशेष मोक्का न्यायालयाने १८ पैकी १४ जणांना दोषी ठरवले होते. आज झालेल्या सुनावणीत विशेष मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी १४ पैकी १२ आरोपींना वेगवेगळ््या कलमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. उर्वरित दोघांपैकी एकाला पाच वर्षांचा कारावास व ५ लाख रूपये दंडाची तर दुस-याला सहा महिन्याचा कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या १२ जणांना जन्मठेप
अन्यर खान उर्फ गुजर खान मिर्झा खान (रा. गुलशननगर बालेपीर बीड), मुजीब खान मिर्झा खान पठाण, सय्यद नासेर सय्यद नूर, सय्यद शाहरूख सय्यद नूर, शेख उवेद शेख बाबू, शेख सरफराज उर्फ सरू डॉन, शेख शहेबाज शेख कलीम (रा. रोशनपुरा बीड), शेख अमर शेख अकबर (रा. गुलशन नगर बीड), शेख बबर शेख युसूफ (रा. खासबाग बीड), आवेज काझी (रा. काझी नगर बालेपीर बीड), शेख इम्रान उर्फ काला शेख रशीद (रा. काझीनगर बालेपीर बीड), शेख मझहर उर्फ काल्या उर्फ हाफ मर्डर शेख रहीम (रा. बांगर नाला बीड) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.