29 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeमहाराष्ट्रबीड, परभणी प्रकरणांची न्यायालयीन चौकशी

बीड, परभणी प्रकरणांची न्यायालयीन चौकशी

मुख्यमंत्र्यांची घोषणा, बीडच्या पोलिस अधीक्षकांची बदली

-परभणीत पोलिस निरीक्षक निलंबित, विरोधी पक्षाचा सभात्याग

नागपूर : प्रतिनिधी
बीड जिल्ह्याला हादरवून सोडणा-या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची तसेच परभणीतील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायद्याखाली कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगताना फडणवीस यांनी कर्तव्यात कुचराई केल्याबद्दल बीडच्या पोलिस अधीक्षकांवर बदलीची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले तर परभणीच्या घटनेत पोलिसांच्या बळाचा वाजवीपेक्षा जास्त वापर केल्याचा ठपका ठेवत पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करण्याची घोषणाही फडणवीस यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने विरोधी पक्षाने सरकारचा निषेध नोंदवत सभात्याग केला.

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या आणि परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर उसळलेला हिंसाचार, पोलिसांनी आंदोलकांवर केलेला लाठीहल्ला तसेच सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्यांचा पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या अल्पकालीन चर्चेला देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले. आपल्या उत्तरात दोन्ही प्रकरणांच्या सविस्तर घटनाक्रमाची माहिती देताना फडणवीस यांनी बीडच्या सरपंचांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार कुणीही असला तरी त्याच्यावर कारवाई होणार असून या घटनेची पोलिस महानिरीक्षकांच्या अंतर्गत एसआयटी नेमून तसेच तेथील संपूर्ण परिस्थितीची न्यायालयीन चौकशी केली जाईल, असे फडणवीस म्हणाले. मस्साजोग येथील प्रकरण अतिशय गंभीर आहे. केवळ संतोष देशमुख यांच्या हत्येपुरते हे प्रकरण मर्यादित नाही तर या प्रकरणाची पाळेमुळे खोदावी लागतील तसेच बीड जिल्ह्यात निर्माण झालेली कायद्याच्या कमतरतेची परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल, असे ते म्हणाले.
बीडमध्ये ज्या प्रकारे अराजकाचे राज्य तयार करण्याचा प्रयत्न होत आहे, ते अतिशय चुकीचे आहे. यात पोलिस प्रशासनाचादेखील दोष असून या पुढे असा निर्ढावलेपणा सहन केला जाणार नाही.

गुन्हेगारीचे पाळेमुळे खोदून काढू
बीड जिल्ह्यात अशा प्रकारे गुन्हेगारी करणा-यांची पाळेमुळे आम्ही खोदून काढू. या गुन्ह्यात कलम ३०२ लागेलच; पण त्यांच्या सोबत काम करणा-या सगळ्यांवर एकत्रितपणे मकोका लावण्यात येईल. तसेच या गुन्ह्यात प्रत्यक्षपणे कुणी सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांना संघटित गुन्हेगारीचा भाग समजून मकोकामध्ये टाकण्यात येईल. बीड जिल्ह्यातील वाळूमाफिया आणि भूमाफियांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत एक मोहीम हाती घेऊन कारवाई करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

…तर वाल्मिक कराडवर कारवाई
बीडच्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव घेतले जात आहे त्यामुळे या घटनेचा सूत्रधार कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. वाल्मिक कराड हा या गुन्ह्यात दोषी आढळला तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, त्याचे कोणासोबत फोटो आहेत याचा विचार न करता कारवाई केली जाईल, अशी नि:संदिग्ध ग्वाही फडणवीस यांनी दिली.

देशमुख कुटुंबीयाला
१० लाखांची मदत
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली असून, या घटनेतील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही चौकशी तीन ते सहा महिन्यांत पूर्ण करणार असल्याचे म्हटले. तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला सरकारच्या वतीने १० लाख रुपयांची मदत घोषित केली.

सोमनाथ सूर्यवंशीचा
मृत्यू मारहाणीने नाही
मृत्यूची न्यायालयीन चौकशी करणार : मुख्यमंत्री
परभणीच्या घटनेत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिस कोठडीतील पोलिसांच्या मारहाणीने झालेला नाही. पोलिस कोठडीतील व्हीडीओ फुटेजमध्ये त्याला मारहाण झाल्याचे आढळून आलेले नाही. परभणीत जाळपोळ सुरू असताना व्हीडीओमध्ये जे लोक दिसले, त्यांना अटक करण्यात आली. यात सोमनाथ सूर्यवंशीसुद्धा होता. त्याला दोनदा दंडाधिका-यांपुढे हजर करण्यात आले. त्या वेळी पोलिसांनी तुमच्याविरुद्ध थर्ड डिग्रीचा वापर केला का? किंवा तुम्हाला मारहाण झाली का? असे विचारले असता सोमनाथ सूर्यवंशीने नाही, असे सांगितले. या संदर्भातील सगळे व्हीडीओ उपलब्ध आहेत. सोमनाथच्या वैद्यकीय अहवालात त्याला श्वसनाचा आजार असल्याचा उल्लेख आहे. त्याला पोलिस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत नेले जात असताना त्याने सकाळच्या वेळी जळजळ होत असल्याची तक्रार केली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तथापि, या प्रकरणात संशय राहू नये म्हणून सूर्यवंशीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
परभणीतील घटनेचा आणि त्या दिवशी निघालेल्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चाशी संबंध नाही. या घटनेतील आरोपी हा या मोर्चात नव्हता तो आपल्या बहिणीच्या घरून आला होता, असे फडणवीस म्हणाले. परभणीत घडलेली घटना ही हिंदू विरुद्ध दलित अशी दंगल नाही. सर्व राजकीय नेत्यांनी अशा प्रकरणात संयमाने आणि जेवढ्या लवकर तणाव कमी होईल तो प्रयत्न केला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR