बीड : प्रतिनिधी
राज्यभरात गाजत असलेल्या बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात प्रमुख संशयित वाल्मिक कराड याला ३१ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची सीआयडी चौकशी बीड पोलिस ठाण्यात होत आहे. त्याचवेळी आता बीड पोलिस ठाण्यात पाच पलंग आणण्यात आले आहेत. या प्रकरणाचा संदर्भ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी वाल्मिक कराड यांच्याशी जोडला आहे.
आमदार रोहित पवार यांनी एक्सवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बीड पोलिस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत. हे पलंग स्टाफसाठी मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत. नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलिस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी.
दरम्यान, पोलिस ठाण्यात मागवलेल्या पलंगाच्या बातम्या येताच पोलिसांनी तातडीने खुलासा केला आहे. बीड पोलिस ठाण्यात पोलिस शिपायांसाठी कॉट आणल्याची माहिती दिली आहे. सीआयडीकडून वाल्मिक कराड याची १५ दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयात मागितली गेली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला १५ दिवसांची पोलिस कोठडी दिली. पोलिस कोठडीत असताना वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडली होती. त्याला ऑक्सिजन लावावे लागले होते.