28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रबुलडाण्यातील केस गळतीला जिल्हा प्रशासनासह कृषी विभाग जबाबदार

बुलडाण्यातील केस गळतीला जिल्हा प्रशासनासह कृषी विभाग जबाबदार

शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा रोष

बुलडाणा : प्रतिनिधी
बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास १५ ते १६ गावांमध्ये गेल्या २५ दिवसांपासून केस गळती होणे व त्यानंतर टक्कल पडणे अशा आजाराने नागरिक त्रस्त आहेत. दररोज रुग्णांची संख्या वाढतच आहे.

सद्यस्थितीत २१० ते २२० रुग्ण बाधित असून प्रशासन मात्र वेळकाढू धोरण अवलंबत आहे. केंद्र सरकारची आयसीएमआरची टीम या परिसरात येऊन गेली, चार दिवस अभ्यास करून वातावरणातील विषारी घटकामुळे केस गळती होण्याचा प्राथमिक अंदाजही त्यांनी वर्तवला, मात्र या प्रकरणी आता रविकांत तुपकर यांनी प्रशासन व कृषी विभाग केस गळतीला जबाबदार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

यावेळी बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की , शेगाव तालुक्यातील ज्या परिसरात केस गळती होत आहे, त्या संपूर्ण गावाच्या शेतशिवारातील जमीन ही समतल म्हणजे सपाट आहे. पावसाळ्यात या परिसरातील प्रत्येक शेतात पाणी हे तुंबून राहते व पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. शेतात पाणी तुंबून राहते आणि या परिसरातील शेतकरी हे मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर पिकांसाठी करत असतात.

परिणामी हे पाणी तुंबल्यामुळे हे रासायनिक खत या पाण्यात विरघळते आणि कालांतराने ते जमिनीत झिरपते. त्यामुळे या परिसरात जमिनीतील पाण्यात अनेक प्रकारचे रासायनिक द्रव्ये मिसळली गेली आहेत. आधीच हे पाणी पिण्यास अयोग्य आहे. वरून त्यात रासायनिक खतांचा शिरकाव झाल्याने, पाण्यात अनेक विषारी रसायने मिसळल्याने हे पाणी दूषित झाले आहे.

दरम्यान, कृषी विभाग या परिसरात शेतक-यांना कुठल्याही प्रकारचे समुपदेशन करत नाही. पाण्याचा निचरा करण्यासाठी कुठलीही उपाययोजना करत नाही. जवळच अकोला येथे कृषि महाविद्यालय आहे. मात्र कृषि महाविद्यालयातील शास्त्रज्ञ या परिसरात भेट देत नाहीत.

जिल्हा प्रशासनही धिम्म आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग जबाबदार आहे. रासायनिक खते ही जमिनीतील मातीत आणि पाण्यात मिसळल्याने ही केस गळती होत असल्याचाही निष्कर्ष आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. याला दुजोरा देत रविकांत तुपकर यांनीही हीच भूमिका ठरवून जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला जबाबदार ठरवले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR