लातूर : प्रतिनिधी
‘बेटी बचाओ… बेटी पढाओ’ अभियानाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार लातूरात बुधवारी सायंकाळी समोर आला आहे. याप्रकरणी लातूरातील स्वामी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी सांगितले, आरती अक्षय सुरवसे (वय २४ रा. म्हाडा कॉलनी, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, लातूरातील तात्याराव लक्षमण सरवदे, महादेव संतराम सावंत याच्यासह अन्य एका महिलेने संगणमत करुन म्हाडा कॉलनी परिसरात काही महिला, नागरिकांना भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ… बेटी पढाओ’ या अभियानात पे-टू-पे सोशल फौंउडेशनमध्ये मुलीच्या नावाने ५५० रुपये भरुन सभासद झाल्यानंतर तिच्या लग्नाच्या वेळी १ लाख रुपये मिळतील असे आमिष दाखविले. शिवाय, याबाबत खोटे सांगून विश्वासघात करुन फिर्यादीसह परिसरातील इतर महिलांची फसवणूक केली. ही घटना बुधवारी उघडकीस आल्याने पैसे भरलेल्या महिला, नगारिकांत एकच खळबळ उडाली. या प्रकाराने संतप्त झालेल्या महिला, स्थानिक नागरिकांनी तिघांनाही पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.