28.6 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeमहाराष्ट्रबोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर

बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा १४ वर

मुंबई : प्रतिनिधी
‘गेट वे ऑफ इंडिया’ येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटीच्या अपघातातील मृतांची संख्या १४ झाली असून गुरूवारी अपघातग्रस्त नीलकमल बोटीच्या सांगाड्यात आणखी एक मृतदेह सापडल्याची माहिती अधिका-यांनी दिली. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, आणखी एक लहान मुलगा बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले असून, त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

‘नीलकमल’ ही प्रवासी बोट बुधवारी पर्यटक आणि प्रवाशांना घेऊन घारापुरीकडे जात होती. दुपारी ३.५५ वाजता नौदलाच्या एका ‘स्पीड बोटी’ने प्रवासी बोटीला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यामुळे ‘नीलकमल’ बोटीला भगदाड पडले. त्यातून पाणी आत शिरल्याने बोट बुडू लागली. अपघाताची माहिती मिळताच नौदल, तटरक्षक दल व मुंबई सागरी पोलिसांच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नौदलाच्या ११ नौका, तटरक्षक दलाची एक व यलोगेट पोलिस ठाण्याच्या ३ नौका तसेच स्थानिक मच्छीमार नौकांच्या सहाय्याने मदतकार्य सुरू करण्यात आले. नौदलाच्या चार हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली. दोन्ही बोटींवर प्रवासी आणि कर्मचा-यांसह असे एकूण ११५ जणांना बचाव कार्यात वाचवण्यात आले. त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला. आज आणखी एक मृतदेह सापडल्यामुळे मृतांचा आकडा आता १४ झाला. मृत व्यक्ती बोटीतच अडकून पडली होती. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे अधिका-याने सांगितले. यातील ८ मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR