पुणे : पुण्यातील बोपदेव घाटात मित्रासोबत गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. तीन दिवस उलटून गेले तरी अद्याप पोलिसांना आरोपींचा थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींची माहिती देणा-यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे.
३ ऑक्टोबर रोजी रात्री ११-१२ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, त्याआधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. यासोबतच आतापर्यंत पोलिसांकडून दोनशेहून अधिक सराईतांचीही चौकशी करण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी सांगितले.
पोलिसांनी दोन संशयित आरोपींचे स्केच केले जारी
दरम्यान, बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन संशयित आरोपींचे स्केच पोलिसांना जारी केले आहेत. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे विविध पथक आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच जवळचे सर्व सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासण्यात येत आहेत. यासोबतच आरोपींची माहिती देणा-यास पोलिसांनी १० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.