बोरी : अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या मंदिरात श्रीराम मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. बोरी येथील शिवगीर बाबा मठामध्ये शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. प्रभू श्रीरामचंद्र मुर्ती प्रतिष्ठाना निमित्त शहरामध्ये घरोघरी गुढी उभारण्यात आली होती. गावातील नागरीकांनी दारासमोर भव्य रांगोळी काढल्या होत्या.
सकाळी ८ वाजता श्रीराम मंदिरापासून रामलल्लाच्या प्रतिमा व पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये श्रीराम भक्तांसह ढोलताशा, टाळ, मृदंग, गोंधळी, बँड पथक, कलशधारी महिला भगव्या टोप्या घातलेले तरुण मंडळी, महिला मंडळी, शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्रामस्थ, व्यापारी मोठ्या संख्येने सहभाग झाले होते. यावेळी जय श्रीरामाच्या घोषणांनी आसमंत दुमदुमले होते. ही मिरवणूक राम मंदिर, शिवगिरी बाबा मठ, ग्रामपंचायत चौक, सोमानी कॉलनी, कौसडी फाटा, बसस्थानक, मेनरोड, पेठ गल्ली दक्षिणमुखी हनुमान मंदिर व समारोप राम मंदिरामध्ये महाआरती करून करण्यात आला.
दक्षिण मुखी हनुमान मंदिरामध्ये सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह भ प मधुकर महाराज खापरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या नंतर महाप्रसाद कार्यक्रमाचा भावीकानी लाभ घेतला तर शिवगीर बाबा मठामध्ये बाल व्यास राहुल महाराज राजूरकर यांच्या मधुर वाणीतून शिवपुराण कथेचे निरूपण करण्यात आले. यानंतर महाप्रसादाचे लाभ भाविकांनी घेतला. हे सर्व कार्यक्रमाचे नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले होते. बोरी परिसरातील विविध मंदिरामध्ये ग्रामस्थांनी या राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रम घेण्यात आले. सायंकाळी ७ वाजता रामेश्वर, सोमेश्वर मंदिरात व श्रीराम मंदिरात ५००० दिव्यांचा दिपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बोरीमध्ये अयोध्या नगरी अवतरल्याचे दिसून येत होते.