छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
वक्फ बोर्ड विधेयकावरून अद्याप नितीश कुमारांनी भूमिका जाहीर न केल्यावरून शिवसेना नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. आता भाजप आणि त्यांच्या चेल्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आपली भूमिका विचारू नये. अगोदर नितीशबाबूंच्या फतव्याकडे पहावे, असा टोला अंबादास दानवे यांनी भाजपला लगावला आहे.
दरम्यान, केंद्रातील एनडीए सरकार हिवाळी अधिवेशनात वक्फ बोर्ड सुधारित विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. या विधेयकावरून सध्या देशभरात गदारोळ सुरू आहे. विरोधकांनी एनडीए सरकारच्या या विधेयकाला विरोध दर्शवला आहे.
नितीश कुमारांच्या जदयूमध्ये सध्या या विधेयकाबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते.
या विधेयकाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याआधी नितीश कुमार यांनी बिहारमधील वक्फ बोर्डाच्या काही नेत्यांची भेट घेतल्याचे जदयूचे राज्यसभेतील खासदार संजय झा यांनी सांगितले आहे. नितीश कुमार यांनी सुन्नी व शिया अशा दोन्ही वक्फ बोर्डांच्या प्रतिनिधींची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी मुस्लिम समजाच्या काही नेत्यांची भेट घेत त्यांचे या विधेयकाबाबत काय म्हणणे आहे ते राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यास सांगितले आहे.
त्यांचे या विधेयकाबाबतचे विचार जदयू केंद्र सरकार व वक्फ संशोधन विधेयकासाठी सरकारने नेमलेल्या संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) पर्यंत पोहोचवणार आहे. याबाबत वक्फ बोर्ड व मुस्लिम समाजाने त्यांची प्रतिक्रिया कळवल्यानंतरच जदयू आपली भूमिका स्पष्ट करेल, असे झा यांनी सांगितले.