22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रभाजपला ३ आकडी संख्या गाठणे कठीण जाणार!

भाजपला ३ आकडी संख्या गाठणे कठीण जाणार!

मुंबई : विशेष प्रतिनिधी
२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने शंभरहून अधिक जागा जिंकत महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारली. मात्र नुकत्याच लोकसभा निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीनंतर या विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी तीन आकडी आमदारसंख्या गाठणे कठीण जाणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या सत्ताधारी महायुतीसमोर महाविकास आघाडीने कडवे आव्हान उभे केले आहे. तरी राज्यात भाजपला पुन्हा एकदा १०० पार जागा जिंकण्याची संधी आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने जुळवून आणलेली समीकरणे कदाचित पक्षाला मदत करू शकतात.

विधानसभा निवडणुकीत भाजप १४८ ते १५२ जागांवर लढत आहे. तसेच मागच्या वेळच्या जिंकलेल्या १०५ जागा कायम राखण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. भाजपने यावेळी अनेक विद्यमान आमदार आणि अनुभवी नेत्यांना पुन्हा संधी देण्यावर भर दिला आहे. त्याशिवाय उमेदवारी देताना भाजपने इलेक्टिव्ह मेरिटचा विचार केला. त्यामुळे भाजपचा या निवडणुकीतील स्ट्राईक रेट चांगला राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याशिवाय आणखी एक मुद्दा म्हणजे लोकसभा निवडणुकीप्रमाणे भाजपने विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा तिढा फारसा लांबवला नाही. विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू होती. या बाबी भाजपच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे. तसेच त्यामुळे या विधानसभेत भाजप पुन्हा एकदा १०० पार मजल मारून सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तविली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR