16 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपाच्या जाहिरातीत शाहू महाराजांचा फोटो डावलला

भाजपाच्या जाहिरातीत शाहू महाराजांचा फोटो डावलला

संभाजीराजे छत्रपतींचा आक्रमक पवित्रा

कोल्हापूर : प्रतिनिधी
शपथविधी सोहळ्यासाठी जाहिरातीमध्ये महापुरुषांचे फोटो छापले. मात्र, शाहू महाराजांचा फोटो छापला नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राला घडवण्यामध्ये शाहू, फुले, आंबेडकरांचे मोठे योगदान आहे. शाहू महाराजांना बाजूला करून जी जाहिरात दिली ती चालणार नाही, महाराष्ट्राला ही न पटणारी गोष्ट आहे. शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही. भाजपने ही चूक दुरुस्त करावी, असा इशारा स्वराज पक्षप्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. भाजपकडून आजच्या (५ डिसेंबर) दैनिकांमध्ये शपथविधी सोहळ्यासाठी जाहिराती देण्यात आल्या आहेत. मात्र, या जाहिरातीमध्ये राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना स्थान देण्यात आले नाही. सोशल मीडियामधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी भाजपने सर्वच प्रमुख वृत्तपत्रांत पान भरून जाहिरात दिली आहे. यात मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार या भाजपच्या नेत्यांच्या फोटोसह महापुरुषांचे फोटो छापण्यात आले आहेत. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो दिसत नाही. आनंद दिघे यांचाही फोटो नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करण्यात आला होता. मात्र आज शपथविधी सोहळा पार पडत असताना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नसल्याने भाजपची जाहिरात चर्चेचा विषय ठरली आहे.

दरम्यान, संभाजीराजे म्हणाले की, निवडणुकीमध्ये हार-जीत होत असते, देवेंद्र फडणवीस यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी सांगितले की, पक्षीय राजकारणापेक्षा महाराष्ट्र सुपर पॉवर कसा करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही राज्याला इतका इतिहास नाही तितका इतिहास महाराष्ट्राला आहे. त्यामुळे नवीन महाराष्ट्र घडवण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात असावा ही माझी अपेक्षा आहे. ते पुढे म्हणाले की, ईव्हीएमबद्दल अनेक पक्षांचे वेगवेगळे तर्क आहेत. त्यामध्ये न पडता आता पुढे कसे जाता येईल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. केंद्रात आणि राज्यात आता तुमच्याकडे सत्ता आहे. त्यामुळे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचा तिढा प्राधान्याने सोडवावा. जे जे शब्द दिले होते ते आता त्यांनी पुन्हा एकदा सोडवावे.

मराठा आरक्षण कसे टिकवणार?
संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. मराठा समाजाचे आरक्षण कसे टिकवणार? हे सरकारने सांगावे, अशी मागणी त्यांनी केली. ते टिकणार नसेल तर मग मराठा समाजाला कसे आरक्षण देणार हे सांगणे गरजेचे आहे. माझा काही सल्ला मागितला तर याबाबत मी सल्ला द्यायला तयार आहे. दोनदा एससी, बीसी आरक्षण उडाल्यामुळे तिस-यांदा कशा पद्धतीने टिकेल हे मराठा समाजाला सांगितले पाहिजे. सगळ्या समाजाचे प्रश्न कसे सोडवायचे हे पाहणे महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे पाच वर्षे आहेत, तर ताकदीने हा मुद्दा मांडला पाहिजे, असे ते म्हणाले.

तिसरी आघाडी चिंतन करणार
शपथविधी सोहळ्याला कशामुळे विलंब झाला हे मला सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शपथविधी सोहळ्याला मला निमंत्रण आहे मात्र प्राधिकरणाच्या बैठकीमुळे मला जाता येणार नसल्याचे ते म्हणाले. तिसरी आघाडी चिंतन करूनच आता पुढे जाईल. बच्चू कडू यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा देखील पराभव झाला असेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR