जळगाव : प्रतिनिधी
भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे हे नेहमीच चर्चेत असतात, आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे ते अडचणीत आल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत पण आता दानवे यांनी केलेल्या कृतीमुळे ते वादात सापडले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पक्षात सहका-यांना कसे वागवले जाते, याचे हे उदाहरण आहे असे म्हणत भाजप आणि दानवेंना टोला लगावला.
दरम्यान, शरद पवार हे सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असलेल्या जामनेर येथे त्यांची सभा होणार आहे. रावसाहेब दानवे यांनी केलेल्या कृतीसंदर्भात पवारांना विचारले असता त्यांच्या पक्षात सहका-यांना कसे वागविले जाते, याचे हे उदाहरण आहे, असे शरद पवार म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या पथकाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासल्या. यावर विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, विरोधकांना कसा त्रास द्यायचा हे सत्ताधा-यांनी ठरवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेबाबत विचारले असता पवार यांनी लोकसभा निवडणुकीत मोदींनी महाराष्ट्रात घेतलेल्या सभांची आठवण करून देत मिश्किलपणे टिप्पणी केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी महाराष्ट्रात सोळा ठिकाणी सभा घेतल्या. त्यांच्या ज्या ठिकाणी सभा झाल्या त्या १६ पैकी ११ ते १२ ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही मोदींनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, असे पवार म्हणाले.