17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रभाजपा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद द्यायला तयार होती

भाजपा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद द्यायला तयार होती

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
‘उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद द्यायला भाजपने तयारी दर्शवली होती. यासाठी एका व्यक्तीने मध्यस्थीही केली होती. पण तसे झाले नाही, असा गौप्यस्फोट शिंदे गटातील बड्या नेत्याने केला आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात विविध खुलासे होताना दिसत आहेत. त्यातच आता शिंदे गटाच्या एका नेत्याने २०१९ च्या सत्तास्थापनेबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष संजय शिरसाट यांनी नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी २०१९ च्या सत्तास्थापनेवेळी काय घडलं? याबद्दलचा सविस्तर घटनाक्रम सांगितला. २०१९ च्या निवडणुकीत लोकांनी भाजप-शिवसेनेला बहुमत दिलं होतं. पण मुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू झाला. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळावे अशी मागणी शिवसेनेची होती. संजय राऊत उद्धव ठाकरेंचे कान भरायचे. त्यामुळे हा वाद वाढतच गेला. भाजपने पहिले अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी शिवसेनेकडून कुणीतरी चर्चेसाठी यावे, अशी मागणी होत होती.

उद्धव ठाकरेंनी फोन घेतले नाहीत
भाजपने उद्धव ठाकरेंना पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यास संमती दर्शवल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी फोन घेतले नाहीत. गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटलांना सांगितले की बोलणे करून द्या, पण त्यांचेही त्यांनी ऐकले नाही. शिवसेना-भाजपची ही युती तुटू नये यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदेंनीही त्यांना सांगितले की भाजप मुख्यमंत्रिपद देतंय, तुम्ही याबाबत विचार करा. पण उद्धव ठाकरेंना पाच वर्षे मुख्यमंत्रिपद हवे होते असे संजय शिरसाट म्हणाले.

२०१९ च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेत वाद
दरम्यान महाराष्ट्रात २०१९ ला झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रि­पदाचा मोठा वाद निर्माण झाला होता. मुख्यमंत्रिपदावरून युतीमध्ये फूट पडली आणि उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR