मुंबई : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. ग्राहकाला यामुळे दिलासा मिळाला आहे. त्याच्या रोजच्या खर्चात थोडी बचत झाली आहे. तर दुसरीकडे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.
दरम्यान, सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत असल्याने सद्यस्थितीला भाज्यांचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. परंतु बळिराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
टोमॅटो ५ रु. तर वांगे १० रुपये किलोने विकत असल्याने भाजीपाला उत्पादक शेतक-यांचा वाहतुकीचाही खर्च निघत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक शेतक-यांनी टोमॅटो आणि वांगे रस्त्यावर फेकून दिल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय इतर भाजीपाल्यांचेही दर कमी झाल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
आठवडी बाजारात भाजीपाल्यांची आवक वाढली आहे. पोषक वातावरणामुळे यावेळी भाजीपाल्यांचे उत्पादन वाढले आहेत. परिणामी, मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर, नाशिक, पुणे मार्केट यार्ड येथील भाजीपाला विभागात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने किमती उतरल्या आहेत. भाजीपाला नाशवंत असल्याने झटपट विक्री करण्याचा सपाटा सध्या सुरू आहे. त्यामुळे भाजीमंडईत दर कोसळले आहेत. उन्हाळ्याच्या तोंडावर ग्राहक राजाची सध्या मिजास आहे. त्यांना अनेक दिवसांनंतर पालेभाज्यांची विविध रेसिपी चाखता येणार आहे. एरवी ग्राहकांच्या खिशाला भाजीपाला घेणे सुद्धा अवघड होऊन बसले आहे. ग्रामीण भागातील बाजारात त्यामुळे सध्या ग्राहकांची भाऊगर्दी उसळली आहे.
रबीचे पीक बहरणार
गेल्या पंधरवड्यापासून गायब असलेली थंडी अचानक वाढल्यामुळे धुळे जिल्ह्यातल्या रबी पिकांना त्याचा फायदा होणार आहे. तापमानाचा पारा हा ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे कमी झालेल्या तापमानाचा फायदा गहू, हरभरा आणि अन्य पिकांच्या वाढीला होणार आहे. थंडीचा कडाका असाच कायम राहिला तर येणारे उत्पन्नही चांगले राहील अशी आशा शेतक-यांना आहे.