नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात सोन्याच्या दागिन्यांना अधिक महत्त्व दिले जाते. भारतात लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमांमध्ये महिला सोन्याच्या दागिन्यांना पहिली पसंती देतात. आपल्या देशात प्रत्येक घरातील महिलांकडे थोड्या प्रमाणात सोनं असतेच. धार्मिक कार्यक्रमांवेळी सोन्याच्या दागिन्यांचा वापर करण्यास पसंती दिली जाते.
भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेत सोन्याच्या दागिन्यांचा वापर अधिक केला जातो. महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत अधिक सोन्याच्या दागिन्यांची आवड असल्याचे पाहायला मिळते. भारतात काही राज्यांमध्ये धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिला सोन्याच्या दागिने घालतात.
जागतिक सोने परिषदेच्या एका रिपोर्टनुसार भारतातील महिलांच्या जवळ २४ हजार टन सोनं आहे. हे सर्वाधिक सोनं असल्याचे मानले जाते. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या रिपोर्टनुसार भारतातील महिलांकडे जगातील सोन्यापैकी ११ टक्के सोन्याचे दागिने आहेत. भारतातील महिला जेवढे सोने वापरतात ते जगातील सोन्याचा वापर करणा-या इतर टॉप पाच देशांच्या तुलनेत अधिक आहे.
आपल्या देशात सर्वाधिक सोनं दक्षिण भारतातील महिला वापरतात. दक्षिण भारतात देशातील एकूण सोन्यापैकी ४० टक्के सोनं आहे. तामिळनाडू राज्यात सर्वाधिक २८ टक्के सोनं आहे. इतर राज्यांच्या तुलनेत तामिळनाडूमध्ये सोन्याचे दागिने सर्वाधिक आहेत.
कोणत्या देशांकडे किती सोनं
अमेरिकेकडे ८ हजार टन सोनं आहे. जर्मनीकडे ३३०० टन, इटलीजवळ २४५० टन, फ्रान्सकडे २४०० टन, रशियाकडे १९०० टन सोनं आहे. भारताने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ब्रिटनमध्ये ठेवलेलं १०० टन सोनं देशात परत आणलं आहे. १९९१ मध्ये भारताकडे परकीय चलन कमी असल्याने देशातील सोने विदेशात ठेवावे लागले होते.