25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयभारतातील हि-यांचे क्षेत्र आर्थिक संकटात!

भारतातील हि-यांचे क्षेत्र आर्थिक संकटात!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातील हिरे क्षेत्राला आता घरघर लागली असून, हे क्षेत्र मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. कारण गेल्या तीन वर्षांपासून आयात आणि निर्यात या दोन्हीतही घट झाली आहे. त्यामुळे पेमेंट डिफॉल्टचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता हि-याच्या फॅक्टरीही बंद होत आहेत. यातून नोक-याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आर्थिक संशोधन संस्था जीटीआरआयने यासंंबंधीची माहिती दिली. त्यामुळे एकेकाळच्या आघाडीच्या उद्योगावर निर्माण झालेले सावट दूर करण्याची मागणी जोर धरीत आहे.

ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हचे (जीटीआरआय) संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी हि-याच्या आयात आणि निर्यातीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने पेमेंट डिफॉल्ट, फॅक्टरी बंद पडणे आणि मोठ्या प्रमाणात नोक-यांचे नुकसान झाले आहे. गुजरातमधील हिरे उद्योगाशी संबंधित ६० हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून भारताच्या हिरे उद्योगावरील संकट किती गंभीर आहे, याचा अंदाज येतो, असे म्हटले आहे. यासोबतच या समस्या सोडविण्यासाठी तातडीने पावले उचलून भविष्य सुरक्षित करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

इकॉनॉमिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार २०२१-२२ मध्ये १८.५ अब्ज डॉलर्सवरून २०२३-३४ मध्ये २४.५ अब्ज डॉलर्सवर हि-याची आयात घसरली आहे. ते म्हणाले की, रशिया-युक्रेन संघर्षाचा जागतिक हि-यांच्या पुरवठा साखळीवरही परिणाम झाला आहे. रशिया हा एक मोठा हिरा उत्पादक देश आहे. त्यावरील निर्बंधांमुळे व्यापार आणखी गुंतागुंतीचा झाला आहे. तसेच जागतिक हि-यांचा व्यापार मंदावला आहे. प्रयोगशाळेत उगवलेल्या हि-यांच्या वाढत्या ग्राहकांच्या मागणीला नैसर्गिक हि-यांच्या मागणीवर परिणाम होत आहे, असेही श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.

प्रयोगशाळेत उगवलेले हिरे अधिक किफायतशीर आणि टिकाऊ असतात, असे मानले जाते. जीटीआरआयच्या म्हणण्यानुसार दुबई हि-यांचे उत्पादन करीत नाही. परंतु तरीही भारताच्या हि-यांच्या आयातीत त्यांचा वाटा सतत वाढत आहे. दुबई बोत्सवाना, अंगोला, दक्षिण आफ्रिका, रशिया येथून रफ हिरे आयात करते आणि नंतर ते भारतात निर्यात केले जातात.

७ हजारांवर कंपन्या चिंतेत
भारतीय हिरे उद्योगामध्ये हिरे कापणे, पॉलिश करणे आणि निर्यात करणे यासारख्या विविध कामांमध्ये गुंतलेल्या ७ हजारांहून अधिक कंपन्या आहेत. या कंपन्यांही जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे चिंतेत आहेत. आयात-निर्यातीत मोठी घट चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळे हि-याचा उद्योग संकटात सापडला आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका
एकीकडे भारतातील हिरे उद्योगाला घरघर लागलेली असतानाच रशिया-युक्रेन युद्धाचाही मोठा फटका या क्षेत्राला बसला. कारण या युद्धामुळे जागतिक हि-यांच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. मुळात रशिया हा एक मोठा हिरा उत्पादक देश आहे. परंतु निर्बंधांमुळे रशियातील उत्पादनाला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे पुरवठा साखळीच विस्कळीत झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR