नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दरवर्षी भारतात लाखो तरुणी विवाहबंधनात अडकतात. धक्कादायक बाब म्हणजे, यातील अनेकींचे कमी वयात लग्न होते. एका आकडेवारीनुसार, भारतात २० कोटींहून अधिक महिलांचा बालविवाह झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. जगभरात ६.४ कोटी तरुणी आणि महिलांचे १८ वर्षांच्या होण्याआधीच लग्न केले जाते, यापैकी एक तृतीयांश भारतातील तरुणी आहेत.
सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स रिपोर्ट २०२४ नुसार, प्रत्येक पाच मुलींपैकी एका मुलीचे १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच लग्न होते, तर २५ वर्षापूर्वी लग्न करणा-यांची संख्या चारपैकी एक आहे. अल्पवयीन विवाह रोखण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या असून गेल्या काही वर्षांत ६८ कोटी बालविवाह रोखण्यात आले आहेत.
एवढ्या प्रगतीनंतरही लैंगिक समानतेत जग मागे पडल्याची खंत संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली. महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अनेक महिलांना अजूनही लैंगिक आणि प्रजनन आरोग्याच्या अभावासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सध्याची परिस्थिती पाहता स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी १७६ वर्षे लागतील.
जगभरातील परिस्थिती सुधारण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी निर्धारित केलेल्या १६९ उद्दिष्टांपैकी २०३० पर्यंत केवळ १७ टक्के उद्दिष्टे साध्य होतील, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०१५ मध्ये जगभरातील नेत्यांनी जी उद्दिष्टे निश्चित केली होती, ती गरिबी संपवणे, स्त्री-पुरुष समानता मिळवणे आणि अशा अनेक समस्या सोडवणे होते, परंतु या उद्दिष्टांकडे आपली वाटचाल थांबली आहे.
प्रयत्न अधिक तीव्र करणे आवश्यक
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या म्हणण्यानुसार, हा अहवाल पाहता, २०३० पर्यंत अजेंडा पूर्ण होईल, परंतु त्यासाठी आपल्या प्रयत्नांना आणखी मजबूत करणे आवश्यक आहे.