22.8 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeराष्ट्रीयभारतात सर्वाधिक वेळा इंटरनेट बंद करण्याची वेळ

भारतात सर्वाधिक वेळा इंटरनेट बंद करण्याची वेळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
, इंटरनेट ही काळाची गरज बनली आहे. अ‍ँड्रॉईड फोनमुळे याचा वापर वाढला आहे. भारतातही याचा वापर वाढला आहे. परंतु जगाच्या तुलनेत भारतात सर्वाधिकवेळा इंटरनेट बंद राहते. २०२३ मध्ये सर्वाधिक इंटरनेट व्यत्ययाच्या बाबतीत भारत अव्वल स्थानावर राहिला आहे. गेल्या ५ वर्षांत ५०० हून अधिक वेळा इंटरनेट बंद केले. विशेषत: मणिपूरमध्ये याची सर्वाधिक झळ पोहोचत आहे.

इंटरनेट सेवेच्या व्यत्ययामुळे व्यक्ती, बँकिंग, प्रवास, ऑनलाइन सेवा, अभ्यास आदी कामांत अडथळा निर्माण होतो. मानवी जीवनात इंटरनेट सर्वात महत्त्वाचे असताना भारतात इंटरनेट सर्वाधिक वेळा बंद करावे लागत आहे. मे ते डिसेंबर २०२३ दरम्यान, मणिपूरमध्ये सुमारे ३२ लाख लोकांना २१२ दिवस इंटरनेट समस्यांना सामोरे जावे लागले. याशिवाय ५ दिवस किंवा त्याहून अधिक काळ चालणा-या शटडाउनची संख्या २०२२ मध्ये १५% वरून २०२३ मध्ये ४१% पर्यंत वाढली आहे.

देशाच्या काही भागांत इंटनरनेट बंद करण्यात आले आहे. निषेधाच्या वेळी ब-याचदा चुकीच्या आणि दिशाभूल करणा-या बातम्या पसरवल्या जातात. अशा खोट्या बातम्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी इंटरनेट सेवा बंद केली जाते. ब-याचदा या अफवा सोशल मीडियावर व्हॉट्सऍप, फेसबुक आणि ट्विटरवरून पसरतात, जे लोकांना भडकवण्याचे काम करतात. म्हणूनच अशा परिस्थितीत बाधित क्षेत्रात इंटरनेट सेवा थांबविणे आवश्यक आहे. मात्र, इंटरनेट सेवा बंद केल्याने सरकारला इंटरनेट सेवा देणा-या कंपनीचे आर्थिक नुकसान होते. एका नव्या अहवालानुसार इंटरनेट शटडाऊनमुळे इंटरनेट सेवा देणा-या कंपन्यांना तासाला सुमारे २ कोटी ४५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. इंटरनेट सेवा देणा-या या कंपन्यांना सरकारच्या निर्देशानुसार सेवा बंद कराव्या लागतात. मणिपूरमध्ये हिंसक घटनांमध्ये अद्याप घट झालेली नाही.

अशा स्थितीत २०२३ मध्ये राज्यात ३ मे, २५ जुलै, २३ सप्टेंबर, २६ सप्टेंबर, १० नोव्हेंबर, १९ नोव्हेंबर, २ डिसेंबर आणि १८ डिसेंबर रोजी इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली होती. याशिवाय १६ फेब्रुवारी, २४ फेब्रुवारी आणि १० सप्टेंबर २०२४ रोजी इंटरनेट सुविधा खंडित झाली आहे. त्याच वेळी जम्मू आणि काश्मीरमध्ये इंटरनेट बंदची संख्या २०२२ मधील ४९ वरून २०२३ मध्ये १७ पर्यंत कमी झाली आहे.

२०२३ मध्ये सर्वाधिक वेळा इंटरनेट बंद
२०२३ मध्ये पाकिस्तानमध्ये ७ वेळा, पॅलेस्टाईनमध्ये १६ वेळा, इराणमध्ये ३४ वेळा, इराकमध्ये ६ वेळा, युद्धग्रस्त युक्रेनमध्ये ८ वेळा आणि म्यानमारमध्ये ३७ वेळा इंटरनेट बंद करण्यात आले. जगातील इतर देशांमध्ये ५९ वेळा इंटरनेट बंद करण्यात आले. मात्र, भारतात इंटरनेट बंद होण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. त्याचा मोठा फटका दैनंदिन कामकाजाला बसला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR