22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeक्रीडाभारताने पाकिस्तानला चारली धूळ

भारताने पाकिस्तानला चारली धूळ

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आज भारत-पाकिस्तानमध्ये चुरशीची लढत रंगली. प्रथम फलंदाजी करताना भारताची घसरगुंडी झाली. एकानंतर एक विकेट गमावल्याने निर्धारित षटकांत भारताला ११९ धावाच काढता आल्या. त्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागणार, असे चित्र होते. परंतु भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहने कमाल केली आणि पाकिस्तानी फलंदाजांवर पकड निर्माण करीत त्यांना ११३ धावांपर्यंतच रोखले. त्यामुळे कमी धावसंख्या असतानाही भारताचा ६ धावांनी विजय झाला. या विजयामुळे भारताची घोडदौड कायम राहिली.

भारत-पाकिस्तान सामन्यात टॉस जिंकून पाकिस्तानने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे मॅच थांबला. भारताकडून रोहित शर्मा आणि विराट कोहलीने डावाची सुरुवात केली. पण भारताचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाले. विराट ४ तर रोहित शर्माने १३ धावा केल्या. विराट कोहली सलग दुस-या मॅचमध्ये मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. भारताच्या दिग्गज खेळाडूंनी विराट कोहलीला सलामीला पाठवण्याऐवजी यशस्वी जयस्वालला सलामीला पाठवावे, असा सल्ला दिला होता. मात्र, भारतीय संघाने रणनीती बदलली नव्हती. त्याचा मोठा फटका टीम इंडियाला बसला. कारण पाकिस्तानविरुद्ध आज टीम इंडियाची हराकिरी पाहायला मिळाली. परंतु भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळे पाकिस्तानचे फलंदाज आपली कमाल दाखवून देण्यात अपयशी ठरले. त्यामुळे साधारण लक्ष्य असतानाही पाकिस्तानला विजय मिळवता आला नाही.

विराट सलामीला अपयशी
विराट कोहली वर्ल्डकपमधील दोन्ही सामन्यात सलामीला आला. परंतु त्याला धमाकेदार सुरुवात करता आली नाही. विराटने वर्ल्डकपमधील आयरलँडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात १ रन केला होता तर आज पाकिस्तानविरुद्ध ४ धावा करू शकला. या दोन्ही मॅचमध्ये विराट कोहलीला सलामीला पाठवण्याची रणनीती चुकल्याचे स्पष्ट झाले. आता अमेरिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय संघ रणनीती बदलणार का, हे पाहावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR