यंग ब्रिगेडने अखेरचा सामनाही घातला खिशात
हरारे : वृत्तसंस्था
भारताची युवा ब्रिगेड झिम्बाब्वेविरुद्ध पाचवा टी-२० सामना खेळली. हरारे स्पोर्टस् क्लबवर हा सामना रंगला. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेला १६८ धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला केवळ १२५ धावाच करता आल्या. त्यामुळे अखेरचा सामना जिंकत टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध मालिका ४-१ ने जिंकली.
लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली नाही. सुरुवातीलाच घसगुंडी झाल्याने झिम्बाब्वेची अवस्था बिकट झाली. एकानंतर एक फलंदाज बाद होत गेल्याने अखेरच्या सामन्यात यजमान संघाला हार पत्करावी लागली. पाच सामन्यात झिम्बाब्वेने पहिलाच सामना जिंकला. त्यानंतर चारही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
भारताच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वे संघातील सलामीला आलेल्या वेस्ली माधवेरेला खातेही उघडता आले नाही. तो शुन्यावर बाद झाला. मात्र दुसरा सलामीवीर मारुमणीने ५ चौकारांसह २७ धावा केल्या. ब्रायन बेनेटने २ चौकारांच्या मदतीने १०,डायन मेयर्सने १ षटकार आणि ४ चौकारांसह ३४ धावा केल्या. कर्णधार सिकंदर रझा केवळ ८ धावा करून बाद झाला. जॉनाथन कॅम्पबेल ४ धावाच करू शकला तर क्लाइव्ह मदंडे १ धावा करून बाद झाला. फराझ अक्रमने २७ धावा केल्या तर ब्रँडन मवुटा ४ धावा करून बाद झाला. रिचर्ड नगारावा खाते न उघडता परतला तर ब्लेसिंग मुझाराबानी नाबाद १ धाव करू शकला. त्यामुळे भारताने अखेरच्या सामन्यात ४२ धावांनी विजय मिळवित ४-१ ने मालिका जिंकली.