ऐतिहासिक कामगिरी, गुकेश जगातील सर्वांत तरुण बुद्धिबळपटू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताचा गुकेश जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरला. गुकेशने चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनचा पराभव करत हा खिताब पटकावला. विश्वनाथन आनंदनंतर आता डी गुकेश भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला. गुकेश हा केवळ १८ वर्षांचा असून तो जगातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. गुकेशने गॅरी कास्पोरोव्हचा विक्रमही मोडित काढला. त्यामुळे त्याची कामगिरी भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरली.
सिंगापूर येथे गुरुवार, दि. १२ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्याच्या १४ व्या निर्णायक सामन्यात विश्वविजेता डिंग लिरेनचा पराभव करून गुकेश सर्वात तरुण विश्वविजेता ठरला. गुकेश आणि डिंग यांनी गुरुवारी सामन्याच्या अंतिम डावात प्रत्येकी ६.५ गुणांसह बरोबरी साधली. १४ व्या डावात सामन्याच्या ५३ व्या चालीत डिंगने चूक होईपर्यंत अनिर्णित दिशेने वाटचाल केली होती. गुकेशने डिंगवर दबाव आणला. यात गतवर्षीचा विश्वविजेता लिरेन फसला आणि भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश विश्वविजेता ठरला. डी. गुकेशचे नाव दोम्माराजू गुकेश असे असून त्याने १८ व्या वर्षी विश्वविजेता होण्याचा बहुमान पटकावला. त्याने जगज्जेता डिंग लिरेनचे आव्हान मोडून काढत इतिहास घडवला.
गुकेशचा जन्म ७ मे २००६ रोजी चेन्नई येथे झाला. त्याने वयाच्या ७ व्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. त्याला सुरुवातीला भास्कर नागय्या यांनी प्रशिक्षण दिले. नागय्या हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळपटू आहेत. तसेच ते चेन्नईमध्ये होम चेस ट्यूूटर आहेत. त्यांच्यानंतर विश्वनाथन आनंदने गुकेशला खेळाची माहिती देण्याबरोबरच त्याला प्रशिक्षणही दिले. गुकेशचे वडील डॉक्टर असून आई व्यवसायाने मायक्रोबायोलॉजिस्ट आहे.
विश्वनाथ आनंदनंतर
ऐतिहासिक कामगिरी
गुकेश अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. त्याच्या आधी विश्वनाथन आनंद २०१२ मध्ये बुद्धिबळ चॅम्पियन बनला होता. गुकेशने याआधी वयाच्या १७ व्या वर्षी एफआयडीई ही मानाची बुद्धिबळ स्पर्धाही जिंकली होती. आता गुकेशने चीनच्या लिरेनचा १४ डावानंतर ७.५-६.५ अशा गुणांनी पराभव केला. डी गुकेश चेन्नईचा रहिवासी आहे.