सेलू : एकत्र कुटुंब पद्धतीत संवाद होता. नात्यांची वीण घट्ट होती. एकत्र कुटुंब पद्धती ही भारताची ताकद आहे. स्त्रियांनी कुटुंब एकत्र ठेवले आहे, असे प्रतिपादन हास्य कवी अशोक नायगावकर यांनी केले.
शहरातील साई नाट्यगृहात दि.१६ रोजी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्रमंडळाच्या वतीने हास्य कवी नायगावकर यांच्या मिश्किली हास्य कवितांच्या कार्यक्रमास श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कवी नायगावकर यांनी श्रोत्यांशी मिश्किल संवाद साधत आपल्या विनोदी शैलीत सादर केलेल्या विडंबनाने सेलूकर रसिकांना खळखळून हसवले.
तर गंभीर कवितांनी अंतर्मुखही केले. राजकीय चर्चेवर व्यंगात्मक टिका करताना ते म्हणाले की, कालच गटार आजच्या पेक्षा स्वच्छ होते. त्यांनी टिळकांशी संवाद, माय, गाव आणि शहराचे बदलते चित्र स्पष्ट करणारी तेव्हा आणि आता, बहिणाबाई, मिळवती, कर्जमाफी वर्ड बँकेला या कविता सादर केल्या. त्यांची डावे आणि उजवे ही कविता श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेऊन गेली. त्यांच्या स्टेन या शहरात टाकले पण बघ पुन्हा बायपास करावेच लागले या कवितेतील ओळीने वास्तव परिस्थितीची जाणीव करून दिली.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. स्वागतपर मनोगत माजी नगराध्यक्ष बोराडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. हेमचंद्र हडसनकर यांनी करून दिला. सुत्रसंचलन संध्या फुलपगार यांनी केले. आभार प्रदर्शन सुभाष मोहकरे यांनी केले.