नागपूर : वृत्तसंस्था
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहिल्यांदाच भाषण केलं. त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी फडणवीसांनी शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीत नक्षलवाद्यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. तसेच, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत नक्षलवादी संघटनांचा सहभाग होता, त्यांनी काँग्रेससाठी देशभरात कार्यक्रम घेतले होते, असेही फडणवीसांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, निवडणूक जिंकण्यासाठी काय काय केलं… पहिल्यांदाच महाराष्ट्रात बघितलं, कुणीतरी येतो आणि व्होट जिहादचा नारा देतो. १७-१७ मागण्या तुम्हाला देतात आणि तुम्ही चकार शब्द काढत नाही.
ज्यावेळी देशात नक्षलवादाविरोधात मोठी लढाई सुरू झाली, मोठ्या प्रमाणात नक्षलवादी संपायला लागले, त्यावेळी हा नक्षलवाद शहरांमध्ये सुरू झाला. तेच अराजकतेचे विचार आपच्या मुलांमध्ये रोवले जात आहेत. अराजकतेची पेरणी करायची, यासाठी फ्रंटल ऑर्गनायझेशन तयार करण्याचे काम नक्षलवाद्यांनी केले. याचे पॉप्युलर नाव अर्बन नक्सल, असे आहे.
या फ्रंटल ऑर्गनायझेशनचा उल्लेख अर्बन नक्सल म्हणून केलेला आहे. आता याच संघटनांनी लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांसाठी कार्यक्रम घेतले. आरआर पाटील यांच्या काळात ४८ संघटनांना अर्बन नक्सल म्हणून नमूद केलेलं आहे. १८ फेब्रुवारी २०१४ साली मनमोहन सिंग यांचे सरकार होते, तेव्हा ७२ फ्रंटल संघटनांची नावे समोर आली होती, त्यातील ७ महाराष्ट्रातील आहेत. याच सात संघटनांनी लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसची कामे केली. विरोधकांच्या देशभक्तीवर आमचा अविश्वास नाही, पण निवडणूक जिंकण्यासाठी आपण कोणाची मदत घेत आहोत, हे पाहिले पाहिजे.