मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुका संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने मुंबईत पदाधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभेतील जागावाटप आणि आता पुढे विधानसभेतील जागावाटपावर भाष्य केले. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सर्वांत कमी जागा मिळाल्या. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत. तसेच ‘४०० पार’च्या घोषणेमुळे महायुतीचे नुकसान झाले, असे वक्तव्यही भुजबळ यांनी केले. यावरून आता भाजपातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, भाजपा नेते निलेश राणे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.
आपण ज्येष्ठ आहात, अनुभवी आहात आपण मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेत असलं पाहिजे. आपण युतीमध्ये मंत्री आहात. नेहमी आम्हीच का ऐकून घ्यावे. आघाडीमध्ये मला काय वाटतं ते महत्त्वाचं नसतं, आघाडीला काय वाटतं ते महत्त्वाचं असतं. आघाडी कशी टिकेल हे बघितले पाहिजे, असेही निलेश राणे म्हणाले.
छगन भुजबळांना आवरलं पाहिजे, मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं?, असा सवाल त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात. ही त्यांची भूमिका बरोबर नाही. आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला तसंच पाहिजे, युती, आघाड्या करून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही, असा टोलाही निलेश राणे यांनी भुजबळ यांना लगावला आहे.
मंत्री छगन भुजबळ काय म्हणाले होते?
काल मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची बैठक झाली. या बैठकीत भुजबळ म्हणाले, ४०० पार, ४०० पारचा आकडा दलित समाजाच्या मनावर एवढा बिंबवला गेला. ४०० पार म्हणजे संविधान बदलणार, असं वाटू लागलं. त्यामुळे त्यांच्या मनातील ते काढता काढता नाकीनऊ आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सांगत होते की, असं होणार नाही. तरीही लोकसभा निवडणुकीत काही परिणाम पाहायला मिळाला. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती येणार. हे अशा प्रकारे मध्येच कोणीतरी काहीही काढतं आणि त्यावर चर्चा सुरू होते. हे थांबवलं गेलं पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले.