22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरभूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत हरंगूळ बु. जिल्ह्यात प्रथम

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत हरंगूळ बु. जिल्ह्यात प्रथम

लातूर : प्रतिनिधी
अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अधिकधिक लोकांनी सहभागी व्हावे व सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्वत राखण्यासाठी सहभाग नोंदवावा, यासाठी गावा-गावांमध्ये सदृढ स्पर्धा निर्माण होण्यासाठी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सन २०२२-२३ या वर्षासाठी भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचा ५० लाख रुपयांचा पुरस्कार पटकाविला आहे.
भूजलाच्या अनियंत्रीत उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्यासाठी मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अमंलबजावणीद्वारे सहभागीय भूजल व्यवस्थापन, अधिकाधिक सशक्त करण्यासाठी केंद्र शासन व जागतिक बँक अर्थसहाय्यीत अटल भूजल योजना राज्यातील १३ जिल्ह्यातील ४३ तालूक्यामधील १ हजार १३३ ग्रामपंचायतींमध्ये सरु आहे. लोकसहभागातून भजल व्यवस्थापन करणे हा योजनेचा गाभा आहे. यासाठी ग्रामस्तरावर जल अंदाजपत्रक तयार करणे, भूजल उपलब्धतेतील तूट भरून काढण्यासाठी अस्तित्वातील राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अधिकाधिक अभिसरण करणे, ग्रामस्तरावरील भूजल उपलब्धतेत शाश्वतता साध्य करणे, हे योजनेचे उदीष्ट आहे.
लातूर जिल्ह्यातील अटल भूजल योजनेंतर्गत समाविष्ट ११५ ग्रामपंचायतीपैकी ३५ ग्रामपंचायतींनी सन-२०२२-२३ मध्ये भूजल समृध्द ग्राम स्पर्धेत सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेचे मूल्यांकन उपविभागस्तर, जिल्हास्तर व राज्यस्तर या तीन स्तरावर करण्यात आले. यामध्ये लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांकाचा ५० लाख रुपयांचा पुरस्कार पटकाविला आहे. निलंगा तालुक्यातील जाजनूर ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाचा ३० लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे, तर चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ ग्रामपंचायतीला २० लाख रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR