लातूर : प्रतिनिधी
सध्या थंडीची लाट असल्याने भाजीपाल्यासाठी पूरक वातावरण मिळेनासे झाले आहे. त्यामुळे भाजीपाला शेतीला फटका बसला. अशा परिस्थितीतही जी पिके तरली त्याला बाजारात चांगला दर मिळत आहे. भेंडीला सध्या ९०० ते १००० रुपये कैरेट दर मिळत असल्याने शेतक-यांतून समाधान व्यक्त होत आहे. लातूर शेजारील बसवंतपूर परिसरात अनेक शेतक-यांनी भेंडी लागवड केली. मात्र मध्यंतरी पावसाच्या सरी आल्या, पुन्हा पानधुई पडली त्यामुळे पिकांसह भाजीपाला शेतीला मोठा फटका बसल्याचे शेतकरी दत्ता सरवदे, बिरु सरवदे म्हणाले. अशा परिस्थितीत अथक परिश्रम घेऊन भेंडी वाढविली. २५ गुंठ्यांत लावलेली भेंडी दररोज चार कैरेट निघत आहेत. दरही चांगला मिळत आहे. भेंडी चांगली असल्याने एक हजार रुपये कैरेटला दर मिळत आहे. आतापर्यंत ६० ते ७० हजाराची भेंडी निघाली असून अजून दोन महिने भेंडी निघेल. यात आंतरपीक चवळीच्या शेंगाचेही घेतले आहे. तीचेही ३० हजारांहून अधिक उत्पादन निघाले. चांगला दर मिळत गेला तर भाजीपाला शेती ऊसाला ऐकत नसल्याचे दत्ता सरवदे म्हणाले. वातावरणाने साथ दिली तर भेंडी लाखाच्या पुढे जाईल.
मध्यंतरीच्या बेमोसमी पावसाने टोमॅटोचे मळे कोलमडले, गवार, फु लकोबी, पत्ताकोबी, वरणा, शेपू, मेथी, पालक, चुका, भोपळे, दोडके, वांगी, चवळी, कोथिंबीर, हिरवी मिरची आदी भाजीपाल्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. सातत्याने बदलत असलेल्या हवामानाचाही परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले. मागणी वाढली परिणामी भाजीपाल्याचे दर वाढले. दोन रुपयांचा टोमॅटो मध्यंतरी १०० रुपयांवर गेला आणि सध्या ४० रुपये किलो दराने विकला जात आहेत्.ा इतर भाजीपाल्याचेही दर ८० ते १०० रुपये किलो, असे आहेत.