19.1 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeराष्ट्रीयभोपाळमध्ये आयकरचा छापा, ५२ किलो सोने जप्त

भोपाळमध्ये आयकरचा छापा, ५२ किलो सोने जप्त

कारमध्ये घबाड, ९.८६ कोटींची रोकडही ताब्यात
भोपाळ : वृत्तसंस्था
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आयकर विभागाने छापा टाकून ५२ किलो सोने आणि ९.८६ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. मेंदोरीच्या जंगलात एका कारमधून हे सोने आणि रक्कम ताब्यात घेण्यात आले. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आयकर विभाग आणि लोकायुक्तांच्या संयुक्त छाप्यात ही रक्कम सापडली असून एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने पाहून अधिकारी आश्चर्यचकित झाले.

भोपाळजवळील मेंदोरीच्या जंगलात एका कारवर हा छापा टाकण्यात आला. यावेळी कारमधून मोठ्या प्रमाणात सोने आणि रोख रक्कम सापडली. भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कामांना आळा घालण्यासाठी लोकायुक्त आणि आयकर विभागाकडून कठोर कारवाई केली जात आहे. याबाबत आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभाग आणि लोकायुक्तांच्या संयुक्त छाप्यात एका इनोव्हा कारमधून एकूण ९.८६ कोटी रुपयांची रोकड सापडली.

प्राप्तिकर विभागाच्या या कारवाईत १०० हून अधिक पोलिसांचे पथक सहभागी झाले होते. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या लोकायुक्त आणि आयकर विभागाच्या संयुक्त कारवाईचा हा छापा होता. यापूर्वी धडक कारवाई करत भोपाळ आणि इंदूरमधील एका मोठ्या बांधकाम कंपनीच्या ५१ ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले होते.

ाया प्रकरणात एका बांधकाम कंपनीवर करचोरी आणि इतर बेकायदेशीर कामं केल्याचा आरोप आहे. विभागाने या संदर्भात तपासाला गती दिली असून संबंधित कागदपत्रे आणि पुरावे यांची कसून चौकशी केली जात आहे. इतक्या मोठ्या छापेमारीनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. एवढी मोठी रोकड आणि सोने कोठून आले आणि ते कोणत्या कामासाठी वापरले जाणार होते, याचा शोध आता अधिकारी घेत आहेत. दरम्यान, भोपाळमधील एका माजी आरटीओ कॉन्स्टेबलच्या घरावर आणि कार्यालयावर लोकायुक्तांनी छापा टाकला. ज्यात २ कोटी ८५ लाख रुपये रोख आणि ६० किलो चांदी तसेच ५० लाख रुपये किमतीचे सोने आणि हि-यांचे दागिने सापडले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR