लातूर : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४१-लातूर लोकसभा मतदारसंघात मंगळवार, १६ एप्रिल रोजी तीन उमेदवारांनी पाच नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तसेच १२ व्यक्त्तींनी १७ नामनिर्देशनपत्रे प्राप्त करुन घेतली. लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडे सुधाकर तुकाराम शृंगारे (भारतीय जनता पार्टी) यांनी एक, श्रीधर लिंबाजी कसबेकर (राष्ट्रीय संत संदेश पक्ष) यांनी तीन, सुरेश दिगंबर कांबळे (अपक्ष) यांनी एक असे एकूण पाच नामनिर्देशनपत्रे १६ एप्रिल रोजी दाखल केले.
आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण नामनिर्देशनपत्रांची संख्या ६ झाली असून आतापर्यंत एकूण ५६ व्यक्त्तींनी १०७ नामनिर्देशनपत्रे प्राप्त करुन घेतली आहेत. राष्ट्रीय संत संदेश पक्षाचे अधिकृत आणि भारतीय जनविकास महाआघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून ऍड. श्रीधर लिंबाजी कसबेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करत असतांना राष्ट्रीय संत संदेश पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वनारसे, ऍड.शिवकुमार स्वामी औंढकर, भास्करराव चव्हाण रामेश्वरकर, उमेश उघडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकत्र आले. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवार ऍड. श्रीधर लिंबाजी कसबेकर यांचा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी स्वत: स्विकारला.