मुंबई : सध्या राज्यात मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून वातावरण तापले आहे. संध्याकाळी नागपूरमध्ये दोन गटांत झालेल्या हिंसाचारात अनेक गाड्यांची तोडफोड, दगडफेक तसेच जाळपोळ करण्यात आली. यात ३१ पोलिसांसह पाच नागरिक जखमी झाले. यावरून विरोधकांनी सत्ताधा-यांना लक्ष्य केले आहे. नागपूरमधील राडा हा गेल्या काही दिवसांपासून मंत्र्यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचाच परिणाम असून याला सर्वस्वी हे सरकार कारणीभूत आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप असलेल्या पत्रकार प्रशांत कोरटकरवरील कारवाईच्या मुद्यावर मंत्री नितेश राणे आणि आमदार रोहित पवार यांच्यात काही दिवसांपूर्वीच विधानसभेत जुंपली होती. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रत्यक्ष नाव न घेता पोस्ट करत नितेश राणे यांच्यावर शरसंधान केले आहे.
अखेर सामान्य माणसाची डोकी फोडून, जीव घेऊन, वाहने जाळून आणि घरे पेटवून सरकारने नेमके काय साध्य केले? नागपूरमधील राडा हा गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील मंत्र्यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचाच परिणाम असून याला सर्वस्वी हे सरकार कारणीभूत आहे. राज्यातील वातावरण दूषित करून जातीय आणि धार्मिक द्वेष निर्माण करणा-या मंत्र्यांची सरकारमधून हकालपट्टी झाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे.