देवणी : बाळू तिपराळे
मकरसंक्रांत सण हा अवघ्या ३ दिवसावर येऊन ठेपला आहे. यंदा १५ जानेवारी रोजी संक्रांत साजरी होणार आहे. मकर संक्रांतीला वाण देण्यासाठी महिलांना लागणारे बोळके, सुगड, बनवण्याची कुंभार कारागिरांची लगबग सुरू झाली आहे. या सणाला थोडे दिवस राहिल्याने, बोळके बनवण्याचे काम जोराने सुरू आहे. चिखल माती गोल फिरवत चिखलाच्या गोळ्याला आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून आकार देऊन बोळके बनवण्याचे काम मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सुरू असल्याचे चित्र तालुक्यातील परिसरात पहावयास मिळत आहे.
दरम्यान यंदा कमी पर्जन्यमान राहिल्याने परिणामी दुष्काळी परिस्थिती असूनही परंपरेनुसार हा सण साजरा करण्याकडे शेतक-यांचा कल आहे. सध्या कारागीर मातीच्या साह्याने बोळके बनवण्याच्या कामात मग्न आहेत. बोळके तयार झाल्यानंतर आठवडे बाजारात विक्रीसाठी आणले जातात. ग्रामीण भागात हा सण मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरा केला जातो. लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांचा आवडता सण असल्याने तिळगुळ वाटप केले जाते. तालुक्यातील परिसरात कुंभार कारागीर यांनी सुंदर मातीची भांडी बोळकी तयार केली आहेत. संक्रांतीत बोळक्यांना मोठी मागणी असल्यामुळे दिवाळीनंतर वर्षातला हा एकच सण कुंभाराच्या आयुष्यात गोडवा आणतो. मात्र ज्या प्रमाणात महागाई वाढत आहे. त्या प्रमाणात सुगड, बोळक्यांची किंमत मात्र वाढत नसल्याची खंत कारागीर व्यक्त करतात.
सुगड घेऊन खेडोपाडी विक्री
यावर्षी खूप कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाण्याची टंचाई भासत असून, संक्रात हा वर्षातला आमचा सर्वात मोठा सण आहे. या सणामुळे आम्हाला चार पैसे कमावण्याची संधी मिळते. यावर्षी पाऊस काळ कमी असल्यामुळे सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरीसुद्धा शेतकरी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसत आहेत. हा सण अवघ्या थोड्या दिवसावर येऊन ठेपल्यामुळे सध्या आम्ही मोठ्या प्रमाणात बोळके आणि सुगड घेऊन खेडोपाडी विक्री करत आहोत.
-माधव कुंभार, कारागीर