नागपूर : प्रतिनिधी
मागील काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. दोन समुदायांतील वादामुळे तेथे कायम तणावाचे वातावरण आहे. हिंसाचाराच्या घटनांमध्ये अनेक लोकांचा मृत्यूही झाला होता. तसेच अनेकदा जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत. यात सरकारने लक्ष घातले पाहिजे असे म्हणत मणिपूरमधील या परिस्थितीबाबत सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही अप्रत्यक्षपणे मोदी सराकरला लक्ष्य केले.
दरम्यान, नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर आयोजित कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोपीय सोहळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘निवडणुकीत स्पर्धा करा पण मर्यादा पाळा’ असे म्हणत सत्ताधा-यांचे कान टोचले आहेत. १० वर्षे शांत राहिलेले मणिपूर गेल्या वर्षापासून अशांत आहे. गेले दहा वर्षे तिथे शांतता होती. अचानक तिथे अशांतता घडली. तिथे जे काही झाले, ते घडले आहे की घडवले आहे, असा प्रश्न आहे.
देशात एनडीएचे सरकार परत आले आहे. देशात गेल्या १० वर्षांत बरेच काही चांगले झाले. आर्थिक क्षेत्रात, संरक्षण क्षेत्रात आमची प्रगती झाली. मात्र, अजूनही प्रश्न संपलेले नाहीत. निवडणुकीत जो काही अतिरेक झाला, त्याच्या पुढे जाऊन आता आम्हाला विचार करायचा आहे, असेही भागवत यांनी सांगितले.
भागवत पुढे म्हणाले, प्रचारात ज्या पद्धतीने चुकीचे वक्तव्य करण्यात आले, अशा वक्तव्यांमुळे समाजात तेढ निर्माण होईल, याचा देखील विचार करण्यात आला नाही. यामध्ये आम्हाला नाहक ओढण्यात आले.
मणिपूर भारताचा महत्त्वाचा भाग : सुप्रिया सुळे
गेल्या वर्षभरात मणिपूरच्या प्रश्नावर अनेकदा चर्चा झाली आहे. मणिपूर हा आपल्या देशाचा महत्त्वाचा भाग आहे. तिथल्या महिला, मुले, पुरुष हे सगळे भारतीय आहेत. कालपरवाच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरही हल्ला झाला आहे. याचा अर्थ काही तरी चुकत आहे. मणिपूरच्या प्रश्नावर संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी आम्ही अनेकदा केली आहे. मात्र, केंद्र सरकारने यावर चर्चा केली नाही. हे सरकार मणिपूरचा म देखील बोलायला तयार नाही. मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, मग तिथल्या लोकांना अशी वागणूक का दिली जात आहे’’, असा प्रश्न करत सुप्रिया सुळे यांनी सरकारची कानउघाडणी केली आहे.