इम्फाळ : वृत्तसंस्था
गेल्या वर्षभरापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. या हिंसाचाराच्या घटनामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला तर हजारो लोक बेघर झाले आहेत. मात्र, तरी मणिपूरमध्ये अद्यापही शांतता प्रस्थापित झाली नसल्याचे पाहायला मिळत आहे. मणिपूरमध्ये हिंसाचाराची तीव्रता कायम असून, आज थेट कांगपोकपी येथे पोलिस उपायुक्त कार्यालयावर हल्ला चढविला. त्यामुळे स्थानिक पातळीवर तणाव निर्माण झाला आहे.
मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांवरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारला कायम लक्ष्य केले जात आहे. यावर ३१ डिसेंबर रोजी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी हिंसाचाराच्या मुद्यावरून खेद व्यक्त करत माफी मागितली होती. त्यानंतर आता नव्या वर्षांत अर्थात २०२५ मध्ये तरी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल, असे बोलले जात होते. मात्र, मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला असून, थेट उपायुक्त कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पोलिस अधीक्षक जखमी झाले आहेत. थेट पोलिस उपायुक्त कार्यालयावर हल्ला झाल्याने मणिपूरमध्ये पुन्हा तणाव वाढला असून, कांगपोकपी येथे कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.