लातूर : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रात विधानसभेचे एकूण २८८ मतदारसंघ आहेत. महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदार केंद्र राहतील. या मध्ये ५७ हजार ६०१ ग्रामीण मतदान केंद्र आणि ४२ हजार ५८२ शहरी मतदान केंद्र आहेत. महाराष्ट्रात ९ कोटी ६३ लाख मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या ही ४ कोटी ९३ लाख इतकी आहे. महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६६ लाख इतकी आहे. तसेच १ कोटी ८५ हजार तरुण मतदार आहेत. महाराष्ट्रात २० लाख ९३ हजार तरुण पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तसेच दिव्यांग मतदारांची ६ लाख २ हजार इतकी संख्या आहे. १२ लाख ५ हजार एवढे ज्येष्ठ नागरिक आहेत. विशेष म्हणजे ८५ वर्ष वरच्या मतदारांना घरातून मतदान करता येणार आहे. तसेच मोठी रांग असेल तर रांगेच्या मध्ये खुर्च्यांची व्यवस्था केली जाणार आहे. सर्व मतदान केंद्र २ किमी.च्या आत असणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभेची यंदाची निवडणूक आणि तिचे निकाल हे इतिहासाच्या पानांवर ठळकपणाने नोंदविले जाणार आहेत. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये जे घडलं ते अनेक दशकांपासून घडलं नव्हतं. महाराष्ट्राला एक चांगली राजकीय संस्कृती आहे असं सुरूवातीपासून मानलं जात आहे. असं असलं तरी या राजकीय संस्कृतीला आता खरंच गालबोट लागलं आहे का, राजकारणात घडलेल्या घडामोडींवर लोकांचा रोष आहे का? ते आता निवडणुकीतील मतदानाच्या माध्यमातून समोर येणार आहे.
निवडणूक वेगळी का? : महाराष्ट्रातील सध्याची विधानसभा निवडणूक वेगळी आहे. कारण इथली राजकीय परिस्थिती फार विलक्षण झाली आहे. राज्यातील दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडली. सध्याच्या घडीला राज्यात केवळ भाजप आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकसंघ आहेत.
महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणात भाजपचा मुख्य हाथ असल्याने जनता मतदानातून काय प्रतिक्रिया देते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला सर्वाधिक फायदा झाला होता. काँग्रेस हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर भाजपची मोठी हानी झाली होती. भाजपच्या प्रचंड जागा कमी झाल्या होत्या. त्यामुळे या निकालास लक्षात घेऊन महायुती सरकारने अनेक लोकोपयोगी योजना आणि विकासकामांच्या भूमीपूजनाचा धडाका लावला. लाडकी बहीण ही योजना सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे. महिलांना एसटी बसचं हाफ तिकीट देण्याचा निर्णय तसेच ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी बसचा प्रवास या निर्णयांमुळे सत्तांतर घडवून आणून सत्तेत आलेल्या महायुती सरकारला निवडणुकीत कितपत फायदेशीर ठरतात? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
प्रचाराचे महत्त्वाचे मुद्दे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारच्या प्रचारात विकासकामे, लाडकी बहीण योजना सारख्या विविध मोठ्या घोषणा हे केंद्रबिंदू राहतील. महाविकास आघाडीच्या प्रचारात पक्षफोडीचा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो. उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच अॅँजिओप्लास्टी झाली. अशा परिस्थितीत निवडणुका होऊ घातल्या आहेत. ठाकरे गटाच्या इतर नेत्यांनी उद्धव ठाकरे लवकरच प्रचारात सहभागी होतील असा दावा केला आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू आहे. या निवडणुकीत शरद पवार यांचा पक्ष जास्त फॉर्ममध्ये आहे.