लातूर : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता लातूर लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान झाले असून शहरातील शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन येथे ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी विविध पथके गठीत करण्यात आली असून प्रत्येक पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या बैठकीत दिल्या.
प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे, जिल्हा कोषागार अधिकारी उज्ज्वला पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प संचालक प्रवीण खडके, तहसीलदार सौदागर तांदळे यावेळी उपस्थित होते.
मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि अचूकपणे पार पाडण्यासाठी विविध पथके गठीत करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये नियुक्त अधिका-यांनी आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या नियमांचा अभ्यास करून त्यादृष्टीने पूर्वतयारी करावी. मतमोजणी दिवशी कोणत्याही प्रकारे चूक होवू नये, यासाठी आतापासूनच खबरदारी घेणे आवश्यक आहे. मतमोजणी कक्षातील बैठक व्यवस्था, मतमोजणीसाठीचे टेबल, ध्वनिक्षेपक यंत्रणा आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या. प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कदम, निवडणूक विभागातील नायब तहसीलदार पंकज मंदाडे यांनी मतमोजणीसाठी जिल्हास्तरावर गठीत विविध पथकांची आणि त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीची माहिती दिली.