सोलापूर : महापालिकेच्या नोकरभरतीत निवड झालेल्या सुमारे २०० उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात आली. हे उमेदवार आणि सोबत आलेल्या पालकांमुळे कौन्सिल हॉल गजबजून गेला होता.
महापालिकेची विविध ३१ संवर्गातील ३०२ पदांची नोकर भरती सुरू आहे. या उमेदवारांची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात झाली होती. मार्च महिन्यात निकाल जाहीर झाली. निवड यादी आणि प्रतीक्षा यादी नुकतीच महापालिकेच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली.
निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची छाननी होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १ वाजता सर्व कनिष्ठ अभियंता संवर्गआणि दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजता कनिष्ठ श्रेणी लिपिक व मिडवाईफ या संबंधित उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. मनपा उपायुक्त आशिष लोकरे, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, गिरीश पंडित, ज्योती भगत, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी,सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक लक्ष्मीनारायण दोंतुल यांच्या उपस्थितीत ही छाननी सुरू होती. लिपिक अशोक बिराजदार हे आवश्यक त्या सूचना माइकवरून उमेदवारांना देत होते. दिवसभरात सुमारे २०० उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी झाल्याचे दोंतुल यांनी सांगितले.
महापालिकेची अलीकडच्या काळातील ही सर्वांत मोठी नोकर भरती आहे. पालिकेला या आठवड्यात विविध विभागांत मिळून नवे २०० कायम कर्मचारी, अधिकारी मिळणार आहेत. यातून शहरातील विविध कामे करणे सोपे जाईल. प्रत्येकाला कामाचे नियोजन दिले जाईल, असे उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितले.महापालिका भरतीतील सामाजिक व समांतर आरक्षणानुसार संवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी वेबसाईटवर उपलब्ध आहे. तात्पुरती प्रतीक्षा यादीही उपलब्ध आहे. कागदपत्रांच्या तपासणासाठी एकूण ७० कर्मचारी कार्यरत होते.असे महापालिका सामान्य प्रशासन अधीक्षक लक्ष्मीनारायण दोंतुल यांनी सांगीतले.