वाशिम : प्रतिनिधी
मुस्लिमांसाठी फक्त वंचित बहुजन आघाडी लढते. ते म्हणतात आम्ही मोठे मोठे स्पीकरवर भोंगे लावून त्यावर हनुमान चालिसा वाजवू मात्र त्याला विरोध करून राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचे काम सर्वांत आधी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतील असे वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केले आहे. वाशिममध्ये एका जाहीर सभेत ते बोलत होते.
राज्यात विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणूक लढवणा-या वंचितच्या उमेदवार मेघा डोंगरे यांच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर हे वाशिममध्ये आले होते. यावेळी बोलताना सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. मुस्लिमांसाठी फक्त वंचित बहुजन आघाडी लढते, असे म्हणत आपल्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचे काम सर्वांत आधी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतील. जोपर्यंत मुस्लिमांचे चार-पाच लोक निवडून जात नाहीत तोपर्यंत त्यांचे भले होणार नाही, असेही सुजात आंबेडकर यावेळी म्हणाले.
यावेळी सुजात आंबेडकर यांनी महायुतीसह महाविकास आघाडीवरही जोरदार हल्लाबोल केला. १५ टक्के मुस्लिम समाज महाराष्ट्रात आहे आणि जो पक्ष १५ टक्के त्यांना भागीदारी देईल, १५ टक्के उमेदवारी देईल त्यांनाच मतदान करून आपल्याला विजयी करायचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.