23.2 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeमहाराष्ट्र‘मनसे’चे मतदान गायब झाले

‘मनसे’चे मतदान गायब झाले

राज ठाकरेंची ईव्हीएमवर शंका

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यामधील भाषणातून राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केले आहे. या भाषणामध्ये राज ठाकरेंनी आकड्यांचा उल्लेख करत आपल्याला लोकांनी मतदान केले मात्र ते मतदान कुठेतरी गायब झाले असे म्हटले आहे. तसेच निकालानंतर राज्यात कुठेच उत्साह दिसला नाही तर सन्नाटा दिसून आला असेही राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलताना ईव्हीएमवर शंका घेत ते म्हणाले, काही काही गोष्टींवर विश्वासच बसू शकत नाही. इथे राजू पाटील बसले आहेत. १४०० लोकांच्या गावात राजू पाटलांना किती मतं पडली असतील? त्या गावातून राजू पाटलांना एकपण मत पडलं नाही. यापूर्वीच्या निवडणुकींमध्ये त्यांना, त्यांच्या भावाला मतदान झालं होतं. संपूर्ण १४०० मते राजू पाटलांना पडायची. त्यापैकी एकही मत पडत नाही.

आपल्या मराठवाड्यातील नगरसेवकाला त्याच्या भागातून साडेपाच हजार मतदान आहे. आता विधानसभेला त्याला किती मतदान झालं अडीच हजार. ७० ते ८० हजार मतांनी निवडून येणारे बाळासाहेब थोरात १० हजार मतांनी पराभूत झाले, असे म्हणत हे सारं विश्वास बसण्यासारखं नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. तसेच, राज ठाकरेंचा पराभव झाल्याने ते असं बोलतात असे लोक म्हणतील. मी काय अख्खा महाराष्ट्र बोलतोय, असेही राज ठाकरे म्हणाले.

तीन महिन्यांत लोकांचे मत बदलले?
जे निवडून आले आहेत त्यांनाही शॉक बसला आहे. मला अनेकांचे फोन आले. भाजपाला १३२ जागा मिळाल्या. त्यापूर्वी १०५ आणि २०१४ ला १२२ जागा होत्या. अजित पवारांना ४२ जागा? चार-पाच जागा येतील असे वाटत असताना ४२ जागा! कोणाचा तरी विश्वास बसेल का? अजित पवार, भुजबळ ज्यांच्या जीवावर राजकारण करतात त्या शरद पवारांना १० जागा. कोणाला तरी विश्वास बसण्यासारखं आहे का? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. तसेच पुढे बोलताना, लोकसभेला सर्वाधिक खासदार काँग्रेसचे निवडून आले. सर्वसाधारणपणे एक खासदार म्हणजे ६ आमदार असतात. त्यांचे १५ आमदार येतात. शरद पवार साहेबांचे ८ खासदार त्यांचे १० आमदार येतात. अजित पवारांचा १ खासदार आला. त्यांचे ४२ आमदार येतात. तीन महिन्यांत लोकांचं मत बदललं? असे राज ठाकरे म्हणाले.

आपल्याला लोकांनी मतदान केले आहे
राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना, या मतदानावर जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाही. आपल्याला केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं, असे म्हणताच कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. अशा निवडणुका लढवायच्या असतील तर न लढवलेल्या ब-या. कोणी विजयाचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो.अशा गोष्टी होत असतात, असे राज ठाकरे म्हणाले.
मला एकच गोष्ट सांगायची आहे. ज्या गोष्टी आजपर्यंत पक्षाने तुम्हाला दिल्या, ज्या गोष्टी सांगितल्या, जी आंदोलने केली, ज्या गोष्टींचे निर्णय लागले त्या सतत लोकांसमोर मांडत राहा. आतापर्यंत आपण काय काय केलं, कोणती आंदोलने केली. कोणते विषय मार्गी लागले हे लोकांना सांगितले पाहिजे. काय केलं विचारल्यावर भांबावून जाणं चांगलं लक्षण नव्हे. तुम्ही जाणीवपूर्वक केलेल्या प्रचाराबद्दल खमके नसाल तर कसं होणार? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. राज ठाकरेंच्या पक्षाने विधानसभेच्या १२० हून अधिक जागा लढवल्या होत्या. मात्र त्यांना एकही जागा जिंकता आलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR