बीड : प्रतिनिधी
आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. जरांगे पाटलांची तब्येत खालावली असून उपोषणावर तोडगा काढण्याची मागणी आता जोरू धरू लागली आहे. मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपोषणात सहभागी होत आहेत. मस्साजोग येथील महिलाही आज उपोषणात सहभागी होत आहेत. आता सरकार बहुमताने आले असून समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण, सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर त्यांनी जुन्याच मागण्यांसाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. तर तिस-या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. दीड वर्षापासून त्यांनी मराठा आरक्षणासाठी मोठे वादळ निर्माण केले आहे. आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत अनेक घडामोडी घडत आहेत. सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी उपोषणात सहभागी महिलांनी केली आहे.
सरकारने उपोषण गांभीर्याने घ्यावे
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे. मी कालच मागणी केली आहे. सरकारने शिष्टमंडळ पाठवावे. सरकारने उपोषण गांभीर्याने घेतले पाहिजे. लवकरात लवकर शिष्टमंडळ पाठवून यावर निर्णय घेतला पाहिजे. आज उपोषणात वैभवी सहभागी होणार आहे. आईची तब्येत ठीक असेल तर आईपण सहभाग घेणार आहेत, असे धनंजय देशमुख म्हणाले.
आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिलेले पुरावे आहेत त्यावर चर्चा करून निर्णय घेतील. आपली न्यायाची मागणी आहे. आपण त्यावर ठाम आहोत. मुख्यमंत्र्यांनी तशी यंत्रणा राबवली आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे ही आपली मागणी आहे बाकीचे निर्णय घेण्याचे काम त्यांचे आहे. जे काही पुरावे दिले आहेत त्यावर चर्चा होईल, ते जे निर्णय घेतील ते समोर येईल आणि ते सगळ्यांना मान्य करावे लागेल, असे धनंजय देशमुख म्हणाले.